शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- प्रादेशिक परिवहन कार्यालय
पुणे, दि.५: प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय बस नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांची १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत तपासणी करण्यात आली, या कारवाईत १ हजार ४६४ वाहनांची तपासणी करुन त्यापैकी २४९ वाहनांवर कारवाई करण्यात आली; यामाध्यमातून २२ लाख २२ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शालेय बस चालकांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हा शालेय बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष तथा पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी वेळोवेळी दिले आहेत. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापन व वाहन मालकांनी दक्षता घ्यावी. शाळेच्या बसमध्ये ६ वर्षाखालील मुलांना ने-आण करण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच पोलीस विभागामार्फत वाहनचालक, वाहक, मदतनीस यांच्या पोलीस चारित्र्य पडताळणी करावी. शाळा व्यवस्थापन व शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यांनी स्कुल बस नियमावली व नविन अटी शर्तीचे पालन होत असल्याबाबत तपासणी करण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले आहे.
सर्व शाळांमध्ये शासन निर्णय क्रमांक संकिर्ण ११२५/प्र.क्र. २४१/२५/ एसएम-१, दि. १६ एप्रिल २०२५ नुसार सर्व शाळांमध्ये शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भैतिक सुविधा विकसन समिती यांची स्थापना करण्याची दक्षता शालेय शिक्षण विभागाने घ्यावयाची आहे. सर्व शालेय परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समित्यांनी शालेय बसवर कार्यरत असणाऱ्या वाहन चालकांची दरवर्षी नेत्र तपासणी झाली असल्याचे प्रमाणपत्राची तपसणी करावी. ज्या वाहन चालकांनी प्रमाणपत्र प्राप्त केले नसेल अशा वाहन चालकांना शालेय विद्यार्थी वाहतुकीचे वाहन चालविण्यास दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
शालेय विद्यार्थ्यांवरील अनुचित प्रकार रोखण्याबाबत धोरण निश्चित करण्याकरिता २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये शालेय शिक्षण व महिला बाल विकास विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालातील प्रकरणः क्रमांक १० मध्ये समितीने दिलेल्या निष्कर्ष व शिफारशीमध्ये विद्यार्थी वाहतुकीबाबत पुढील शिफारशी करण्यात आल्या आहेत.
शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याबाबत शाळेने खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही असणे अनिवार्य आहे. शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करणेकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती आवश्यक आहे. तसेच मुली असणाऱ्या शाळांतील वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक आहेत. वाहनचालक, वाहक, क्लीनर यांची पोलीस पडताळणी होणे आवश्यक आहे.
परिवहन विभाग व पोलीस विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संयुक्त तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल, शाळांनी शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षीतपणे होईल याची विशेष खबरदारी घ्यावी. वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

