पिंपरी-चिंचवडच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांना’मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’ किताबसमृद्ध भारतीय संस्कृती व वारशाचे जागतिक व्यासपीठावर सादरीकरण
पुणे: थायलंड येथे नुकत्याच झालेल्या ‘मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल-२०२५’ स्पर्धेत पुण्याच्या दीपाली अमृतकर-तांदळे यांनी अभिमानास्पद कामगिरी करीत ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’ हा किताब जिंकला. समृद्ध अशा भारतीय संस्कृती व वारशाचे कलात्मक सादरीकरण त्यांनी जागतिक व्यासपीठावरून केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा किताब जिंकून भारतात परतल्यानंतर दीपाली अमृतकर-तांदळे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत आपल्या यशाचा खडतर प्रवास उलगडला. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या या संवादावेळी दीपाली यांचे पती संतोष, आई सुनंदा व वडील बाळकृष्ण अमृतकर, मुलगा रेयांश उपस्थित होते. दीपाली या पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळेगुरव येथील राहिवासी असून, आयटी क्षेत्रात नोकरी करतात. पत्नी व आई म्हणूनही त्या अतिशय उत्तम पद्धतीने आपली जबाबदारी सांभाळत आहेत.

दीपाली अमृतकर-तांदळे म्हणाल्या, “जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करताना अभिमानाचा क्षण होता. किड्स, मिस आणि मिसेस या प्रकारांत विविध २५ देशांतील ४० स्पर्धक यामध्ये आले होते. त्यामधून माझे सर्वोत्तम योगदान देत जागतिक स्पर्धेत मिळवलेले हे यश नक्कीच आनंद देणारे आहे. जागतिक दृष्टिकोनातून शांतता, पर्यावरण, पर्यटन, संस्कृती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक वारसा यांना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा एप्लानेट प्रायव्हेट लिमिटेड (टर्निंग इव्हेंट्स इनटू इंडिमबल मेमरीज) संस्थेच्या वतीने आयोजिली जाते.”
“या स्पर्धेत विविध देशांतील स्पर्धकांनी सहभागी होत आपापल्या देशातील वारसास्थळे, संस्कृतींची झलक सादर करत जागतिक ऐक्याचा संदेश दिला. बंगाली पेहराव, राजस्थानी संस्कृती व नववारी साडीतील मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत गणेशस्तवन सादर केले. भारतीय संस्कृती पाहून उपस्थित सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यावेळी भारतीय म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून आला. आत्मविश्वास, सौंदर्य आणि भारतीय संस्कृतीच्या सादरीकरणातून अव्वल स्थान मिळवत ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’ हा किताब मिळवला,” अशी आनंदी प्रतिक्रिया दीपाली यांनी यावेळी दिली.
आयटी क्षेत्रात नोकरी करतानाच माझे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. हा प्रवास खडतर होता. पण अनेक गोष्टी शिकवणारा, भारतीय म्हणून मान-सन्मान देणारा होता. पत्नी व आई म्हणून जबाबदारी पार पाडत असताना ‘पेजेंट ऑफ हेरिटेज’ या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करत हा किताब मिळवणे हे अभिमान व स्फूर्ती देणारे आहे.
– दीपाली अमृतकर-तांदळे, ‘मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स’

