पुणे- ३९ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी ‘नाईट मॅरेथॉन’ म्हणून आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे ‘एक्सपो’ प्रदर्शन आणि टी-शर्ट्स आणि बीब नंबर्स वाटप शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी सुरू झाले. या ‘एक्स्पो’ चे उद्घाटन शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी मॅरेथॉन भवन मैदान येथे सकाळी १०.३० वाजता सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा नेहा दामले यांच्या हस्ते आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू शकुंतला खटावकर, शांताराम जाधव, जॉईंट रेस डायरेक्टर गुरबंस कौर यांच्या उपस्थितीत झाले.. यावेळी मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त अॅड. अभय छाजेड, रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, जॉईंट रेस डायरेक्टर रोहन मोरे, खो-खो वर्ल्ड कप कप्तान प्रतिक वाईकर, अक्षय जैन, सचिन अडेकर व असंख्य धावपटू उपस्थित होते. हे प्रदर्शन दि. ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत दुपारी १२ ते सायंकाळी ६ यावेळी सर्वांसाठी खुले असेल.
विवध खेळांच्या संबंधी असणाऱ्या या प्रदर्शनात एकूण १० फुट x १० फुट आकाराचे १७ स्टॉल्स असून त्यामध्ये टी-शर्ट्स, स्पोर्ट्स शूज, एनर्जी ड्रिंक, एनर्जी जेल्स, सायकल, सॅाक्स ,स्पोर्ट्स वॉचेस, पेन रिलीफ,चॅाकलेट व ज्युस यांचे स्टॉल्स आहेत. लीप जेल, अग्वान्ते ऍक्टिव्हवेअर, सॉर्गेन, अॅन्टोमेक, ओ 7 स्पोर्ट्स, आयबीएस, रगड् इंडियन, मॅप्रो, टू काईंड न्यूट्रिशन, बँक ऑफ बडोदा, झिक्सा, महेश व्हॅल्यू प्रॉडक्ट्स लिमिटेड, एक्स्ट्रीम अॅडव्हेंचर स्पोर्ट्स इव्हॉल्व्ह, भन्साळी बिझग्रो एलएलपी, पोकारी या कंपन्यांनी यात सहभाग घेतला आहे.

