पुणे ता.५ : औंधपासून खडकी पोलिस स्टेशन या रस्त्याच्या अनेक समस्या आहेत. येथे रेल्वेच्या पूलाखालून जात असलेल्या रस्त्यावर नेहमीच अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालून येथे भुयारी मार्ग करावा अथवा उड्डाणपूल करावा अशी मागणी केली आहे. केंद्र
सरकारच्या सेतुबंधन योजनेतून हे काम करता येईल, ही बाब श्री. माने यांनी श्री. गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्याला श्री. गडकरी यांनी मान्यता दिली आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत राज्य सरकारकडून प्रस्ताव देण्याची सूचना श्री. गडकरी यांनी केली आहे. त्यानुसार पुढील काम केले जाईल, अशी माहिती श्री. माने यांनी दिली.
याबाबतचे निवेदन त्यांनी नवी दिल्ली येथे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे आणि विकास लवांडे यावेळी उपस्थित होते.
श्री. माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यातील खडकी पोलिस स्टेशन जवळ रेल्वेचा ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलाच्या खालून जाण्या-येण्यासाठी एकच रस्ता आहे. हा रस्ता औंधरोडसह खडकी रेल्वे स्टेशन तसेच राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी, औंध, औंधरोड, बोपोडी, चिखलवाडी, सांगवी येथून पुणे शहरात जाण्यासाठी तसेच खडकी,कोरेगावपार्क, विमाननगर, येरवडा, नगररस्ता या भागात जाण्यासाठी दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र अंडरब्रिज रस्ता केवळ एक – एक मोटार जाण्या- येण्यासाठी वापरता येतो, इतका अरुंद आहे. त्याचप्रमाणे येथे नेहमी सांडपाणी साठून राहिलेले असते. यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. हा रस्ता मुंबई- पुणे महामार्गाशी खडकी पोलिस स्टेशनसमोर जोडला गेला आहे. पुणे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांचा ताण लक्षात घेता खडकी स्टेशन येथे रेल्वे स्टेशन करण्यात आले आहेत. भविष्यात अनेक रेल्वे गाड्या या मार्गावरून सोडण्यात येतील मात्र याच रस्त्यावर या रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार बांधण्यात आले आहे. भविष्यात यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. या मुळे या रस्त्यावर आणखी वाहतूक कोंडी होणार आहे.
त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भूमिगत मार्ग होणे अत्यंत गरजचे आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सेतुबंधन योजनेतून खडकी रेल्वे स्टेशन उड्डाणपुल करण्याची मागणी माने यांनी श्री. गडकरी यांच्याकडे केली. या योजनेतून भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो तो या ठिकाणी उपलब्ध करून द्द्यावा. अशी विनंती सुनील माने यांनी श्री. गडकरी यांना केली आहे.

