पुणे-पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील कांबळे वस्ती, थेऊर फाटा येथे मोठी कारवाई केली आहे. येथे बनावट आरएमडी आणि विमल पान मसाला गुटखा तयार करणारा अवैध कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सुमित गुप्ता याच्या गोदामावर छापा टाकला. या ठिकाणी बनावट सुगंधित तंबाखू, सुपारी, थंडक पावडर, केमिकल, गुलाबजल, प्रिंटेड पाऊच, बॉक्स आणि पोती असा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आढळून आला. गोदामाशेजारील शेतातही तयार गुटखा आणि कच्चा माल मोठ्या प्रमाणात सापडला.
जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे. यात बनावट गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तीन विशेष बदललेली वाहनेही जप्त करण्यात आली. यामध्ये दोन गोल्डन रंगाच्या टोयोटा इनोव्हा (एमएच-४४-बी-२०२३ आणि एमएच-१२-डीएम-०८८५) आणि एक काळ्या रंगाची टाटा नेक्सॉन (एमएच-१२-क्यूटी-८४६२) यांचा समावेश आहे. या वाहनांची अंदाजे किंमत ५० लाख रुपये असून, १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी कारखान्याचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २५, रा. पत्र वस्ती, थेऊर) आणि तीन कामगार रामप्रसाद ऊर्फ बापू बसंता प्रजापती (वय ५०), अप्पू सुशील सोनकर (वय ४६) व दानिश मुसाकीन खान (वय १८) यांना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. गोदामाचा मालक सुमित गुप्ता मात्र फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२)(i)(iv) व ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. पथकातील राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बास्टेवाड यांचाही यात सहभाग होता.
बनावट गुटख्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फरार आरोपीचा शोध आणि पुढील पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे.

