रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात पोहोचताच सुरक्षा प्रोटोकॉल मोडला. त्यांनी रशियातून एअरलिफ्ट करून आणलेली आपली ऑरस सीनेट कार सोडली आणि पंतप्रधान मोदींसोबत एका गाडीत बसून विमानतळावरून निघाले.
पुतिन यांचा सुरक्षा प्रोटोकॉल जगात सर्वात कडक मानला जातो. त्यांच्या जेवणाची तपासणी रशियातून आणलेल्या मोबाईल लॅबमध्ये होते. सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे – पुतिन यांचे मल-मूत्र देखील सीलबंद पिशवीत मॉस्कोला पाठवले जाते.

विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या मुंबई येथील पासिंग असलेली गाडी वापरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एमएच ०१ पासिंग असलेल्या टोयोटा कंपनीच्या गाडीतून पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी एकत्र प्रवास केला. एएनआय आणि रॉयटर्स या संस्थांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ही गाडी दिसून येत आहे.
पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी विमानतळाहून एका पांढऱ्या टोयोटा फॉर्च्युनरमधून प्रवास केला. या गाडीचा नोंदणी क्रमांक MH 01 असा होता. या गाडीतून ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. गाडीतून एक सेल्फीही घेतला गेला आहे. पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक एक्स हँडलवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
या गाडीची निवड अनेकांना आश्चर्यचकीत करणारी आहे. कारण माध्यमातून समोर आलेल्या वृत्तानुसार, सदर गाडी पंतप्रधानांच्या ताफ्यातील अधिकृत गाडी नव्हती. राष्ट्राध्यक्ष पुतिन त्यांच्या प्रत्येक हालचालीबद्दल विशेष काळजी घेत असतात. याच्या सुरस कथा आंतरराष्ट्रीय माध्यमातून अनेकदा समोर आलेल्या आहेत. दिल्ली विमानतळावरील गाडीच्या निवडीमागे सुरक्षेचे कारण असण्याची शक्यता आहे.
MH 01 पासिंग कुठले?
भारतातील प्रत्येक राज्याच्या इंग्रजी आद्यक्षरानुसार त्या त्या राज्यातील वाहनांची नोंदणी केली जाते. महाराष्ट्रात नोंदणीसाठी MH असे इंग्रजी आद्याक्षर दिले जाते. महाराष्ट्रामध्ये एकूण ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. या प्रत्येक कार्यालयाअंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांना त्या त्या कार्यालयासाठी देण्यात आलेला नोंदणी क्रमांक देण्यात येतो. त्याप्रमाणे MH 01 हा क्रमांक मुंबई शहरासाठी दिला जातो. त्यानुसार ही गाडी मुंबई पासिंगची असल्याचा अंदाज आहे.
पुतिन यांचा दौरा कसा असेल?
पुतिन यांचा अधिकृत कार्यक्रम शुक्रवारी म्हणजे ५ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेऊन पुतिन यांचा दौरा सुरू होईल. राष्ट्रपती भवनातून, राष्ट्राध्यक्ष पुतिन राजघाट येथे स्मृतिस्थळावर श्रद्धांजली वाहण्यासाठी जातील. त्यानंतर ते हैदराबाद हाऊसला भेट देतील. यानंतर रशिया-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि पुतिन हे विविध विषयांवर चर्चा करतील. तेलाची आयात, एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी आणि मुक्त व्यापार करार (FTA) यावर चर्चा होईल, असे सांगितले जाते.

