आचार्य शाहीर हेमंत राजे मावळे यांची खंत :
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन
पुणे : इतर कार्यक्रमांना मोठ्या जागा दिल्या जातात मात्र कीर्तनकारांनी कोणत्यातरी देवळात बसून कीर्तन करायचे. आमचे कीर्तन हे वैभव आहे, त्यात विचारांची मांडणी असते. त्यामुळे कीर्तन करण्यासाठी आम्ही मोठ्या जागा घेतल्या. पूर्वी शनिवार वाड्यावर किर्तन महोत्सव होत होता परंतु काही काळानंतर तेथील परवानगी नाकारत लाल महालात कीर्तन करण्यास सांगण्यात आले. परंतु आता लाल महालातून देखील बाहेर पडावे लागेल की काय अशी परिस्थिती आहे. कारण महोत्सवातील प्रत्येक कामात आता अडथळा निर्माण होत आहे. देवासाठी काम करणारी माणसे असताना दानवासारखी वागणूक मिळत आहे. लाल महालात तरुणीने लावणी केल्यावर चर्चा होते. परंतु कीर्तनाची वैभवशाली परंपरा चालू ठेवणाऱ्यांची चर्चा होत नाही उलट अडचणी निर्माण केल्या जातात, अशी खंत शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंत राजे मावळे यांनी व्यक्त केली.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म सार्धसप्तशती वर्षानिमित्त शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने, श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशीर्वादाने व वै. ह. भ. प. डॉ. किसन महाराज साखरे यांच्या स्मरणार्थ ‘पुणे कीर्तन महोत्सव २०२५’ चे आयोजन ऐतिहासिक लालमहाल येथे करण्यात आले आहे. ह. भ. प. डॉ. यशोधन महाराज साखरे यांचे कीर्तन महोत्सवात होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते झाले. यावेळी सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष नितीन होले, ह. भ. प. प्रा. संगीता मावळे व ह. भ. प. मंगलमूर्ती औरंगाबादकर उपस्थित होते.
पुणे कीर्तन महोत्सवाचे हे सतरावे वर्ष असून, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म सार्धसप्तशती निमित्त तीन दिवस ह. भ. प. डॉ. यशोधन महाराज साखरे यांची वारकरी कीर्तने रंगणार आहेत.
अक्षदा ईनामदार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संगीता मावळे यांनी आभार मानले,

