“कार्यावरील विश्वासामुळेच संघाला भरभरून साहाय्य”
पुणे, ४ डिसेंबर
समाजासाठी आणि देशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते निःस्वार्थीपणे गेली शंभर वर्षे काम करत आहेत. या कार्यामुळेच संघाबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण झाला आहे. या विश्वासामुळे समाज संघाला भरभरून साहाय्य करत आहे, असे प्रतिपादन संघाच्या अखिल भारतीय धर्मजागरण गतिविधीचे समन्वयक शरदराव ढोले यांनी केले.
धर्मजागरण गतिविधीचे अखिल भारतीय कार्यालय पुण्यात बांधले जाणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश उर्फ नाना जाधव, महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, पर्वती भागाचे संघचालक अॅड. चंद्रशेखर कुलकर्णी, ज्येष्ठ कार्यकर्ते दिवाकर पांडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मित्रमंडळ सोसायटीमध्ये ‘अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान’तर्फे मुद्रिका बंगला येथे हा कार्यालय बांधकाम प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
धर्मजागरण विभागाचे काम देशभरात वाढत आहे. त्यामुळे कार्यालयांचीही गरज निर्माण झाली आहे. पुण्यात कार्यालयाची जी इमारत तयार होईल त्यात अध्ययन, संशोधन, संस्था सक्षमीकरण, कार्यकर्ता प्रबोधन, कार्यकर्ता प्रशिक्षण अशा अनेक योजना चालवल्या जातील. प्रशिक्षणाचे अनेक विषय या कार्यालयाच्या माध्यमातून सुरू केले जातील, अशी माहिती ढोले यांनी दिली.
संघ प्रेरणेतून चालणाऱ्या संस्थांना जो निधी किंवा ज्या वास्तू देणगीरूपाने दिल्या जातात, त्यांचा उपयोग योग्य त्याच कारणांसाठी होतो, हा विश्वास समाजात निर्माण झाला आहे. समाजाला बरोबर घेऊनच संघ यापुढेही काम करत राहील, असेही ढोले यांनी सांगितले.
कै. वासुदेवराव आणि कै. कमलताई गोखले या दाम्पत्याच्या दातृत्वाबद्दलची माहिती अॅड. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी दिली. गोखले यांनी त्यांचा मित्रमंडळ सोसायटीतील बंगला अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठानला देणगी स्वरूपात दिल्यामुळेच त्या जागी नवी वास्तू साकारत आहे, असे कुलकर्णी म्हणाले.

