मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे, तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे राऊतांच्या घरी आल्याने या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी राज ठाकरेंनी राऊतांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करत त्यांना काही काळ सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.
संजय राऊत यांना नुकतेच एका गंभीर आजाराचे निदान झाले असून, डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक जीवनापासून दूर राहून विश्रांती घेण्यास सांगितले आहे. याबाबत संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज दुपारी राऊत यांचे निवासस्थान गाठले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 25 ते 30 मिनिटे चर्चा झाली.
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “संजय राऊत आजारी पडल्यापासून राज ठाकरे सतत माझ्या संपर्कात होते. संजय यांच्या उपचारांसाठी त्यांना अमेरिकेला नेले पाहिजे का? किंवा अन्य कोणते वैद्यकीय उपचार केले पाहिजेत? याबाबत राजसाहेब सतत फोनवरून विचारपूस आणि मार्गदर्शन करत होते. आज 20 वर्षांनंतर ते आमच्या घरी आले, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.”
भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. ” तुझा ज्याप्रकारचा आजार आहे, त्यानुसार तुला राहावे लागेल. लोकांमध्ये न जाता दीड-दोन महिने आराम करावा,” असा मोलाचा सल्ला राज ठाकरेंनी संजय राऊतांना दिल्याची माहिती सुनील राऊत यांनी सांगितले.
पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांकडून विचारपूस…आजारपणानंतरही राऊतांची तोफ धडाडली
दरम्यान, संजय राऊत यांच्या आजारपणाची दखल पक्षभेद विसरून सर्वच स्तरांतून घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून राऊतांच्या प्रकृतीची चौकशी केली. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरध्वनीवरून संपर्क साधत राऊत यांना आरोग्याबाबत विचारपूस केली होतीप्रकृतीत सुधारणा होताच संजय राऊत पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. गत सोमवारी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली, ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या पत्रकार परिषदेत आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. आजारपण असूनही त्यांचा राजकीय बाणा कायम असल्याचे यावेळी दिसून आले.

