दिव्यांग दिन उत्साहात साजरा
मुंबई, दि. ०३ डिसेंबर २०२५: दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहायक उपकरणे पुरवण्याच्या उपक्रमात महावितरणने आत्तापर्यंत राज्यभरातील ४९ दिव्यांग कर्मचाऱ्यांना दुचाकी उपलब्ध करुन दिल्या आहेत. तर आगामी सुमारे ५ हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत नियमानुसार ४१२ जागा दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती देतानाच महावितरण व्यवस्थापन नेहमीच दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.
महावितरणचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील प्रकाशगड येथे दिव्यांग दिनानिमित्त बुधवारी (दि. ०३ डिसेंबर) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र पांडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संचालक श्री. पवार म्हणाले, आज दिव्यांगजन सर्वच क्षेत्रात स्वकृर्तृत्वाने यशाची उत्तुंग भरारी घेत आहेत. तीव्र इच्छाशक्ती व अढळ विश्वासाच्या बळावर न्युनगंडावर मात करण्याचे आवाहन त्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना केले. तर दिव्यांग कर्मचाऱ्यांशी कोणताही भेदभाव न करण्याची शपथ घेऊन संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
महावितरणमध्ये कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन कामकाज अधिक सुकर व्हावे, यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येते. त्यांना दिव्यांग भत्ता नियमितपणे दिला जातो. चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत येण्याचा कोणी प्रयत्न करीत असल्यास, अशा बाबी तत्काळ निदर्शनास आणून देण्याबाबत संचालक पवार यांनी सूचित केले.
जगभरातील विख्यात दिव्यांग लेखकांची पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन मुख्य कार्यालयात कार्यरत २३ दिव्यांग कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या वतीने परेश बोरकर आणि रोहिणी साठे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापनाबाबत कृतज्ञता व्यक्त करताना सुविधांसंदर्भातच्या अपेक्षा दिव्यांग कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. या मागण्यांची तातडीने पुर्तता करण्याच्या सूचना संचालक पवार यांनी संबंधितांना दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ व्यवस्थापक प्रणाली निमजे यांनी केले. तर सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांनी आभार मानले.

पुणे महावितरणच्या रास्तापेठ येथील परिमंडल कार्यालयात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी मुख्य अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड यांच्या हस्ते परिमंडलातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. गायकवाड म्हणाले, दिव्यांग कर्मचारी आपल्या व्यंगांवर मात करुन कामात कायम अग्रेसर असतात. त्यांच्या संघर्षातून इतरांनाही प्रेरणा मिळते.महावितरणमध्ये दिव्यांगांसाठी असलेल्या सुविधा व सवलती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तर दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची ग्वाहीही मुख्य अभियंता यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमास उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे यांच्यासह दिव्यांग कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सूत्रसंचालन महेश कारंडे यांनी केले.

