पुणे, दि. ३ : पेरणे (ता. हवेली) पेरणे येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता पुणे-अहिल्यानगर महामार्ग क्र.६० वर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५ वा. पासून ते १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२:०० वा. पर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतुकीत बदलाचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
याअंतर्गत चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अहिल्यानगर कडून पुणे-मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या मार्गे पुण्याकडे जातील.
पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण येथून हडपसरवरुन पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरुर-अहिल्यानगर मार्ग अशी वळविण्यात येतील. तसेच सोलापूर महामार्गावरुन आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळणमार्गे विश्रांतवाडीहून आळंदी व चाकण येथे जातील.
मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी कार, जीप आदी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहिल्यानगरकडे जातील, मुंबई व ठाणे कडून येणारी अनुयायांची वाहने मुंबई-पुणे महामार्गावरुन देहूरोड-निगडी-चऱ्होली-आळंदी-मरकळ-तुळापूर फाटा (लोणीकंद) अशी वळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

