पुणे, दि. ०३ : राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत (NSDC) इस्त्राईलमध्ये “नूतनीकरण बांधकाम” (Renovation Construction) या क्षेत्रातील मोठ्या प्रमाणातील भरती प्रक्रिया सुरू झाली असून प्लॅस्टरींग काम – १००० जागा, सिरॅमिक टायलिंग – १००० जागा, ड्रायवॉल कामगार – ३०० जागा आणि राजमिस्त्री – ३०० जागा या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या पदांसाठी २५ ते ५० वयोगटातील, इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असलेले तसेच किमान तीन वर्षांचा नूतनीकरण बांधकाम क्षेत्रातील अनुभव असलेले उमेदवार पात्र ठरणार आहेत. उमेदवाराने यापूर्वी इस्त्राईलमध्ये काम केलेले नसावे तसेच त्यांचा जीवनसाथी, पालक किंवा मुले सध्या इस्त्राईलमध्ये काम करत नसावीत किंवा तेथील रहिवासी नसावेत, अशी अट घालण्यात आली आहे.
भरतीसंबंधी सर्व सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रिया maharashtrainternational.com या संकेतस्थळावरील Latest Jobs या विभागात उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करून या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक महाविद्यालयांनी ही माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन सहायक आयुक्त सु.रा. वराडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा.

