: समर्थ भारत व्याख्यानमाला
पुणे – जगाच्या इतिहासात अजिंक्य योद्धा बाजीराव पेशव्यांनी अवघ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक युद्धे केली आणि एकही युद्ध ते हरले नाहीत. परंतु त्यांच्या या महान पराक्रमाकडे जाणूनबुजून दुर्लक्षित केले गेले. अवघ्या हिंदुस्थानात त्यांची दहशत एवढी होती की, इराणचा बादशहा नादीरशहा याने दिल्ली लुटण्यासाठी दिल्लीवर आक्रमण केले पण त्याच वेळी बाजीराव पेशवे आपला समाचार घेण्यासाठी दिल्लीला येत आहे ही बातमी कळताच नादिरशहा हा पळून गेला. खरं तर बाजीराव हे दिल्लीला पोहोचले देखील नाहीत. त्यामुळे त्यांचा पराक्रम आठवून आता तरी पेशवाईची बदनामी करू नका, असे आवाहन इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी केले.
समर्थ भारत व्याख्यानमालेत जगन्नाथ लडकत बोलत होते. मार्केटयार्ड जवळील संदेश नगरमध्ये समर्थ भारत व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यावेळी पालखेड युद्ध स्मारक समितीचे संस्थापक सदस्य प्रशांत गोऱ्हे, अशोक धोका, निलय संघवी, मंगेश कुलकर्णी, संदीप खोत आदी उपस्थित होते. जगन्नाथ लडकत यांनी अजिंक्य योद्धा बाजीराव यांच्या विविध शौर्यगाथा तसेच पालखेडच्या लढाईचा संपूर्ण इतिहास उलगडला.
जगन्नाथ लडकत म्हणाले, पेशवाई कालखंडामध्येच अटकेपार झेंडे लावले गेले. पानिपताच्या पराभवाचा कलंक देखील धुवून काढला. स्मार्ट पुणे या संकल्पनेचा पाया देखील याच कालखंडात घातला गेला. पुणे शहर हे त्याकाळी केंद्रस्थानी होते. तरी देखील या महान व्यक्तींच्या नावाखाली विनाकारण जाती-जातींमध्ये द्वेष पसरवण्याचे काम आज देखील केले जात आहे. आता तरी पेशवाई कालखंडाची बदनामी थांबवा. जी शक्ती अशा प्रकारे बदनामी करीत आहे त्यांना पुन्हा एकदा इतिहासाची आठवण करून देण्याची गरज आहे.
घोडदळाचा सर्वश्रेष्ठ सेनानी म्हणजे बाजीराव पेशवे होते असे वर्णन इंग्रज इतिहासकारांनी करून ठेवले आहे तसेच इंग्रज फील्ड मार्शल मॉन्टगोमरी यांनी त्यांच्या ‘A Concise History of Warfare’ या युद्धशास्त्र विषयक ग्रंथात जगातील पहिल्या दहा लढायांमध्ये पालखेडच्या लढाईचा उल्लेख केला आहे. एक बरे झाले हे इंग्रजांनी लिहून ठेवले आहे नाहीतर आज देखील मराठी इतिहासकारांनी लिहून ठेवले असते तर त्यांच्यावर देखील टीका झाली असती.
निलय संघवी यांनी सूत्रसंचालन केले.

