पुणे – मुंढवा येथील कोट्यवधीच्या जमिन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शितल किसनचंद तेजवाणी विदेशात पलायन केल्याची चर्चा रंगविण्यात आली होती. मात्र आज पुणे पोलिसांकडून तेजवाणीला अटक केल्यानंतर पोलीस तपासात या प्रकरणी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे तेजवाणी यांच्या विरुद्ध जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन आणि खडक पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहे. तसेच खडक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, या जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेली अमेडिया कंपनी सहभागी आहे.
मुंढवा येथील तब्बल 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेली ही जमीन केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे, या कोट्यवधींच्या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून अवघे 500 रुपये मोजण्यात आले होते. पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीसाठी हा व्यवहार झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ज्या कंपनीचे भांडवल केवळ एक लाख रुपये आहे, ती कंपनी तीनशे कोटींचा व्यवहार कसा करू शकते, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. प्रशासकीय पातळीवरही या व्यवहाराला प्रचंड गती देण्यात आली होती. उद्योग संचालनालयाने केवळ 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केली होती आणि अवघ्या 27 दिवसांत हा संपूर्ण व्यवहार पूर्ण करण्यात आला होता.महाराष्ट्र शासनाच्या नावावर नोंद असलेल्या या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी शीतल तेजवानी यांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. शीतल तेजवानी आणि मूळ मालक गायकवाड कुटुंब आरोपांच्या घेऱ्यात आहे. शीतल तेजवानी ही जमीन गैरव्यवहारातील बडा मासा आहे. बनावट कागदपत्र तयार करून जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जमिनीचे बोगस कागदपत्र कुणी तयार केले असा प्रश्नही उपस्थित होत आहे. 2014 ला न्यायालयाने तेजवाणी, मूळ मालकांचा दावा फेटाळला होता.

