बोगस मतदान करणाऱ्या 12 तरुणांना अटक
नागपूर _ मतदानाच्या दिवशी कामठी शहरात बोगस मतदानाचा मोठा कट उधळून लावण्यात आला आहे. नागपूर-कामठी रोडवर असलेल्या आशा हॉस्पिटलजवळील एका फार्महाऊसवर निवडणूक विभागाच्या पथकाने धाड टाकली असून, तेथे बोगस मतदानासाठी तयार करण्यात आलेली बनावट ओळखपत्रे आणि बोटावरील शाई पुसण्याचे द्रव्य (केमिकल) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी भाजप उमेदवार अजय अग्रवाल हे यंत्रणेचा गैरवापर करून बोगस मतदान करवून घेत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक विभागाच्या पथकाने सुनील अग्रवाल यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर छापा टाकला. या कारवाईत पथकाला मोठ्या प्रमाणावर बनावट व्होटर आयडी कार्ड्स आणि बोटाला लावलेली शाई पुसण्यासाठी वापरले जाणारे संशयास्पद द्रव्य मिळून आले आहे. या फार्महाऊसवरूनच बोगस मतदानाचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप करण्यात येत असून, घटनास्थळी सध्या मोठा गोंधळ सुरू आहे.
एकीकडे फार्महाऊसवर कारवाई सुरू असतानाच, दुसरीकडे कामठीतील ‘लाला ओळी’ परिसरातील मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 12 तरुणांना सतर्क नागरिक आणि पोलिसांनी रंगेहाथ पकडले. हे सर्व तरुण कन्हान येथील वाघधरे वाडी परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी धक्कादायक कबुली दिली. “आम्हाला प्रत्येकी 200 रुपये देऊन मतदान करण्यासाठी आणले होते,” असे या तरुणांनी सांगितले आहे. पोलिसांनी या सर्व 12 तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, एकाच वेळी फार्महाऊसवरील धाड आणि मतदान केंद्रावरील बोगस मतदारांची धरपकड यामुळे कामठीत राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. सुलेखा कुंभारे यांनी प्रशासनाला धारेवर धरले असून, भाजप उमेदवार अजय अग्रवाल यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

