मुंबई- देशात मनमानी सुरू आहे, अशा 4 शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाचा आजच्या निकालाने निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तबच झाले आहे, असे ते म्हणाले.
नागपूर खंडपीठाने मंगळवारी एका याचिकेवर सुनावणी करताना उद्याची मतमोजणी 21 तारखेपर्यंत लांबणीवर टाकली. कोर्टाच्या या निर्णयामुळे आता राजकीय पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राज ठाकरे यांनी केवळ 4 शब्दांत या निकालाचा समाचार घेतला आहे. देशात मनमानी सुरू आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार म्हणाले, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी ही 3 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबर रोजी एकत्रित करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढली आहे. 21 डिसेंबरपर्यंत सर्वांनाच खूप काळजी घ्यावी लागणार आहे.
आज उच्च न्यायालयाने निकाल पुढे ढकलण्यासंदर्भात दिलेला निकाल म्हणजे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर केलेलं शिक्कामोर्तबच आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली असली तरी निवडणूक आयोग पक्षाच्या दावणीला बांधला तर हेच होणार, हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. राज्यात आज जो काही गोंधळ निर्माण झाला आहे त्यासाठी निवडणूक आयोगासह भाजपादेखील तेवढीच जबाबदार आहे, असे ते म्हणालेत.

