दि. ७ डिसेंबरच्या स्पर्धेची पूर्वतयारी पूर्ण
पुणे -देशातील पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा ३९ वे वर्ष साजरे करत असून, यंदा रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे तीन वाजता ४२.१९५ किमी च्या महिला–पुरुष पूर्ण मॅरेथॉन चा प्रारंभ सणस मैदानाजवळील हॉटेल कल्पना–विश्व येथून होईल. तसेच येथूनच महिला–पुरुष अर्ध मॅरेथॉन दहा किमी, पाच किमी व व्हीलचेअर स्पर्धांचा प्रारंभ होईल. यामध्ये केनिया, इथिओपिया, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, श्रीलंका येथील ७० हून अधिक परदेशी खेळाडूंसह एकूण ११ गटांत सुमारे १५००० हून अधिक धावपटू या स्पर्धेत भाग घेतील. याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मॅरेथॉन भवन येथे ’एक्सपो प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.
यंदा गतविजेती खेळाडू ज्योती गवते, २०२३ सालचा द्वितीय क्रमांका चा विजेता केनियाचा सायमन मवॉगी धावपटू शिवाय सेनादल, रेल्वे, पोलीस, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (ASI) बॉम्बे सॅपर्स, एसआरपीएफ, एनडीए, येथील अव्वल दर्जाचे धावपटू सहभागी होत आहेत. एम्स आंतरराष्ट्रीय संस्थे तर्फे स्पर्धा मार्ग हा मान्यता प्राप्त आहे. विजेत्यांना पुणेमहानगर पालिकेतर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील.
स्पर्धा मार्गावर रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सायकलोहोलिक्स या क्लबच्या ७५ सायकल पायलट्सचे MockDrill , पहाटे ४ ते ६ या वेळात घेतली. यावेळी ॲड सम्राट रावते, रोहन मोरे, सुमंत वाईकर आणि उमेश जाधव यांनी याचे नियंत्रण संपूर्ण स्पर्धा मार्गावर केले.
या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे ५० पंच, तांत्रिक अधिकारी, आणि २० मोटर सायकल पायलट्स सहभागी होतील. संघटनेचे सचिव राजू कुलकर्णी यांचे नेतृत्वात सर्वश्री चंद्रकांत पाटील, विजय बेंगले, रोहित घाग, इ. आंतरराष्ट्रीय पंच काम करणार आहेत. त्यांना सुमंत वाईकर, रेस डायरेक्टर आणि वसंत गोखले, टेक्निकल रेस डायरेक्टर हे मार्गदर्शन करतील. यांचे मॉक ड्रिल शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी पहाटे ५ ते ७ या वेळात स्पर्धा मार्गावर होईल.
या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धे चे ‘एक्सपो’ प्रदर्शन आणि टी शर्ट्स आणि बीब नंबर्स वाटप शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी सुरू होईल. या एक्स्पो चे उद्घाटन शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी मॅरेथॉन भवन मैदान येथे सकाळी १०.३० वाजता सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा नेहा दामले यांच्या हस्ते आणि अर्जुनपुरस्कार विजेते खेळाडू शकुंतला खटावकर, रेखा भिडे, स्मिता शिरोळे यादव, सुरेखा द्रविड, शांताराम जाधव, उमेश झिरपे, जॉईंट रेस डायरेक्टर गुरबंस कौर यांच्या उपस्थितीत होईल.
या मॅरेथॉन साठी वैद्यकीय पथकांची सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली असून सोसायटी ऑफ इमर्जन्सी मेडीसिंसचे डॉ. राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली ८० डॉक्टर्स व ३०० वैद्यकीय परिचारक व फिजिओ यामध्ये काम करतील. सणस मैदानावर एक छोटे २५ बेडचे मिनी हॉस्पिटल केले जाईल. ही कमिटी मॅरेथॉन रूट वर प्रत्येक किमी वर बूथ उभारून या सेवा पुरवितील. १०८ च्या अॅम्ब्युलन्स या साठी मार्गावर आणि प्रारंभ आणि रेस समाप्तीच्या ठिकाणी असतील. डॉ. सचिन लकडे, डॉ. प्रियांक जावळे, डॉ. मुनिंद्र सावंत, डॉ. सुमित जगताप, डॉ. शिवचरण गंधार, डॉ. नुपूर जाधव, डॉ. युवराज जगताप, डॉ. सत्यजित चव्हाण, डॉ.दीपक खैरनार हे या कमिटीत काम करीत आहेत.
मेडिकल कमिटी चे सेमिनार शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते ७ मॅरेथॉन भवन येथे पार पडले त्याला वरील डॉक्टर्स उपस्थित होते. मॅरेथॉन शर्यती दरम्यान होणाऱ्या दुखापती, अपघात, तसेच हृदयाचा त्रास, शरीरातील पाणी कमी होणे या संदर्भात चर्चा झाली आणि त्यावर तातडीचे वैद्यकीय उपचार कसे करावेत याची चर्चा झाली.
सणस मैदान आणि संपूर्ण मार्गावर प्रत्येक किमी वर पिण्याचे पाणी, एक डॉक्टर आणि ३ नर्सिंग स्टाफ, १ अॅम्ब्युलन्स यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक २.५ किमी वर, फिडींग बूथ, एनर्जी ड्रिंक, फळे, स्पंजिंग (वॉटर बूथ) आणि इतर सर्व व्यवस्था “वर्ल्ड अॅथलेटिक्स” आणि भारतीय अॅथलेटिक्स महासंघ, नवी दिल्ली यांच्या नियमांनुसार आणि अटींनुसार करण्यात आली आहे.
भारती नर्सिंग कॉलेज, संचेती फिजिओ कॉलेज,सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ,नवले हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, विश्वराज नर्सिंग कॉलेज, आरोग्यम वैद्यकीय पथक, नवी मुंबई यांची पथके यांचा समावेश यात आहे.
पॉवरफुल अल्ट्रा रनर्स, अहिल्यानगर रनर्स क्लब, बाणेर बालेवाडी रनर्स, सिंधू रनर्स, युनायटेड एंड्यूरोस, रनिंग पंटर्स, पीसीएमसी रनर्स – वाकड अँड पिंपळे सौदागर, नांदेड सिटी रनर्स, बावधन ब्रिज, पीसीएमसी रनर्स – चिंचवड, पीसीएमसी रनर्स – निगडी, एसपीजे स्पोर्ट्स क्लब अँड अॅकेडमी, फीट कव्हर ३६०, विश्व रनर्स, पुणे युनिवर्सिटी रनर्स, कोथरूड डेक्कन रनर्स, एबीसी रनर्स आदि पुण्यातील १७ हौशी धावपटू संस्थांनी प्रत्येक किमी वरील हायड्रेशन पॉईंट्स चे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी घेतली आहे. यांचे धावपटू रेसेस मध्ये भाग घेऊन स्पर्धेच्या यशात सुध्दा हातभार लावतील.
गेली चार वर्षे सायकल पायलटींग व्यवस्था संपूर्ण मार्गावर ,शर्यत संपेपर्यंत, “सायक्लोहोलिक्स” पुणे संस्थेचे ५० सायकल पायलटस अॅड. सम्राट रावते यांचे नेतृत्वा खाली करतात. यावर्षी सुध्दा त्यांचे पथक येत आहे. पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे १० मोटर सायकल पायलट धावपटुंना मार्गदर्शक म्हणून स्पर्धे पुढे नियमा नुसार असतील.
याशिवाय पुणे पोलीस व वाहतूक पोलीस यांचा चोख बंदोबस्त स्पर्धा मार्गावर राहणार असून पुणे महानगर पालिकेतर्फे संपूर्ण मार्गावर पुरेशी उजेड व्यवस्था करण्यात आलेली आहे.
३९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मधील विजेत्या धावपटूंना बांबू सोसायटी ऑफ इंडिया तर्फे बांबू पासून तयार केलेल्या ट्रॉफीज देण्यात येतील, ज्या “टीकाऊ आणि पर्यावरणीय जबाबदारी” चे प्रतीक असेल आणि हेच या वर्षीचे ध्येय वाक्य आहे.
स्पर्धा समाप्तीनंतर सर्व स्पर्धा पूर्ण केलेल्या स्पर्धकांना सणस मैदान येथे पूर्णत्त्व पदक (फिनिशर मेडल), चहा-पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था संयोजन समितीतर्फे करण्यात येणार आहे.
या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सर्व स्पर्धा संपल्यानंतर सकाळी ८ वाजता सणस मैदान येथे संपन्न होईल. क्रीडाप्रेमी पुणेकरांनी स्पर्धेच्या वेळी स्पर्धा मार्गात सर्व स्पर्धक खेळाडूंचे जोरदार स्वागत करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

