– फौजदारी गुन्हे दाखल करण्याची चेतावणी; इतर प्लॅन्टधारकांना परवानगीचे आवाहन
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ने अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. नियमबाह्यपणे सुरू असलेल्या रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लॅन्टविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, या कारवाईची सुरुवात मुळशी तालुक्यातील मौजे जांबे येथील ‘मिलेनियम आरएमसी प्लॅन्ट’वर धडक कारवाई करून झाली.
पीएमआरडीएच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने १ डिसेंबर २०२५ रोजी या अनधिकृत प्लॅन्टवर कारवाई करताना पोकलेन मशीनच्या सहाय्याने प्लॅन्टचे लोखंडी पत्राशेड व आरसीसी वॉल तोडले. त्यानंतर संपूर्ण प्लॅन्ट सीलबंद करण्यात आला. परवानगीशिवाय हा प्लॅन्ट पुन्हा सुरू केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियम 1966 (एमआरटीपी) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी कडक ताकीद मिलेनियम प्लॅन्ट व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. या कारवाईनंतर परिसरातील इतर अनधिकृत आरएमसी प्लॅन्टवरही लवकरच हातोडा पडणार आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. कारवाईत सह-आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, तहसीलदार आशा होळकर, तसेच शाखा अभियंते प्रशांत चौगले, शशिभूषण होले, ऋतुराज सोनवणे, दीपक माने आणि अमित खेडकर यांनी सहभाग घेतला. सह-आयुक्त डॉ.दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत कार्यरत सर्व आरएमसी प्लॅन्टधारकांनी आवश्यक परवानगी घेऊनच बांधकाम व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन केले आहे.

