काँग्रेसचे १६५ नगराध्यक्षपदांचे उमेदवार, काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी प्रचार सभाही गाजवल्या..
पुणे दि. २ डिसेंबर २०२५
नगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुती या सत्ताधारी पक्षांनी सर्व नियम धाब्यावर बसवत आदर्श आचार संहितेचा सर्रास भंग केला. या निवडणुकीत लोकशाही व संविधानांची पायमल्ली करण्यात आली. गैरप्रकारच्या २५ नाही तर २५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी झाल्या पण त्या निवडणूक आयोगापर्यंत किती पोहचल्या हा गंभीर प्रश्न आहे. आजच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे ‘पैसा फेक तमाशा देख’, वगनाट्य रंगले, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
पुणे येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आजच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत सर्वत्र पैशांचा सुळसुळाट होता, दादागिरी व दडपशाही केली, बोगस मतदार दिसून आले. भाजपा, शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व नियम पायदळी तुडवले. सत्ताधारी महायुतीने गाव तिथं बारा भानगडी, करून ठेवल्या आहेत. लोकशाही व संविधानाची पायमल्ली करण्यात आली.
काँग्रेसचे १६५ नगराध्यक्षपदांचे उमेदवार…
या निवडणुकीत काँग्रेस पक्ष दिसला नाही या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस पक्ष पंजा या पक्षाच्या चिन्हावर १६५ नगराध्यक्षपदांसाठी रिंगणात उतरलेली आहे. प्रचारातही काँग्रेस नेत्यांनी विविध भागात प्रचार सभा घेतल्या आहेत. मी स्वतः राज्यभर ६५ प्रचार सभा घेतल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस निवडणुकीत नव्हती या आरोपात काहीही तथ्य नाही. काँग्रेस व विरोधी पक्षांचे नगराध्यक्ष व नगरसेवक विजयी झाले तरी पुन्हा फोडाफोडीचा प्रकार सत्ताधारी करणार नाहीत कशावरून, पण खरा प्रश्न आपली लोकशाही कोणत्या दिशेने जात आहे हा आहे आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
भाजपाला रावणापेक्षा जास्त अहंकार..
छत्रपती शिवाजी महाराजांना भाजपाची टोपी व गमछा घातल्याबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा व त्यांचे नेते महापुरुष व देवांपेक्षाही स्वतःला श्रेष्ठ समजतात, ते देवाचे अवतार आहेत. भाजपाला रावणापेक्षा जास्त अहंकार झाला आहे, असा टोलाही हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला..

