मुंबई -महानगरपालिकेच्या 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत अक्षम्य चुका आणि बोगस मतदारांचा भरणा असल्याचे समोर आले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “आमचे आमदार सुनील शिंदे यांचे नाव यादीत तब्बल 7 वेळा, तर माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे नाव 8 वेळा आले आहे. हा काय सावळागोंधळ सुरू आहे? निवडणूक आयोग म्हणजे एखादी सर्कस झाली आहे का?” असा संतप्त सवाल विचारत, मतदार यादीत 33 हजार बोगस मतदान घुसवल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.
पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी आयोगाचा भोंगळ कारभार पुराव्यानिशी मांडला. ते म्हणाले, “यादीत आमचे आमदार सुनील शिंदे यांचे नाव सात ठिकाणी आले आहे. गंमत म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचे वय आणि फोटो वेगळा आहे, पण व्यक्ती तीच आहे. श्रद्धा जाधव, खासदार अनिल देसाई आणि ज्योती गायकवाड यांचीही नावे दुबार आली आहेत. विशेष म्हणजे, या दुबार नावांमध्ये मराठी मतदारांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.” हा योगायोग आहे की सुनियोजित कट, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
आदित्य ठाकरे यांनी आणखी एक गंभीर मुद्दा मांडला. “नियमानुसार 1 जुलै 2025 नंतर मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करता येत नाहीत. असे असतानाही, या यादीत तब्बल 33 हजार नवीन मतदार कसे काय आले?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, 5 लाख 86 हजार लोकांची दुबार नोंदणी असून, ज्या मृत व्यक्तींचे डेथ सर्टिफिकेट जमा केले आहे, त्यांची नावेही यादीतून वगळण्यात आलेली नाहीत. यामुळे त्यांच्या नावावर ‘प्रॉक्सी वोटिंग’ (बोगस मतदान) करण्याचा डाव आहे का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली.
मतदार यादी तपासणीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांवरही (BLO) आदित्य ठाकरेंनी ताशेरे ओढले. “ज्यांना धड लिहिता-वाचता येत नाही, असे लोक मतदार तपासणी करत आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे मुंबईकरांची थट्टा सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. आम्ही BMC, राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाला विचारात आहोत तुम्ही काय करत आहात? थट्टा करत आहात, तुम्ही सर्कस करत आहात. हा घोळ तुम्हीच घातलेला आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.
या सर्व प्रकाराविरोधात आम्ही स्वतः 3 ते 4 हजार हरकती नोंदवल्या आहेत. निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी आम्ही पत्र दिले असून, या विरोधात मोठी जनचळवळ उभी करू, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

