शिंदेंशी कोणतेही वाद नाहीत, पण…
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कथित मतभेद राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेत. या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी अनेकदा आपल्यात मतभेद असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. पण त्यानंतरही या चर्चेला पूर्णविराम मिळत नाही. आज अखेर फडणवीसांनी या मुद्यावर सविस्तर उत्तर दिले. पण त्याचवेळी आमच्यात एकमत असते तर आम्ही वेगवेगळ्या पक्षात असतो का? असा सवालही केला. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. पण त्यानंतरही त्यांनी एकमेकांची भेट घेतली नव्हती. फडणवीस हे शिंदे तयार होण्यापूर्वीच तासभर अगोदर हॉटेलातून निघून गेले. त्यानंतर शिंदे बाहेर पडले. या घटनेमुळे महायुती सरकारमधील 2 बड्या राजकीय पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्यांत काही मतभेद आहेत का? असा प्रश्न माध्यमांत व राजकीय वर्तुळात चर्चिला गेला. त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘साम’ वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादात सविस्तर उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, माझ्यात व एकनाथ शिंदे यांच्यात कोणतेही वाद नाहीत. आपल्या घरातही दोन भावांची मते काहीअंशी वेगवेगळी असतात. ती मते एक नसतात. दोन्ही भाऊ प्रखरतेने आपापली मते मांडत असतात. तसेच काही गोष्टींवर आमचे एकमत होत नाही. सगळ्या गोष्टींवर आमचे एकमत असते तर आम्ही वेगवेगळ्या पक्षांत का राहिलो असतो? आम्ही एकच पक्ष असतो. पण आम्ही वेगवेगळे पक्ष आहोत. व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आम्ही एकत्रच आहोत आणि आम्ही एकत्रच राहणार आहोत.
एखाद्या निवडणुकीत काही गोष्टी घडल्या की लगेच मतभेद झाले असे काहीही नसते. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. निवडणुका आल्या की आम्ही तुमच्यावर गोष्टी लागू असे करता येत नाही, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत तुम्हाला एकनाथ शिंदे व अजित पवार काही ठिकाणी एकत्र दिसले. तर काही ठिकाणी भाजप व एकनाथ शिंदे एकत्र आहेत. काही ठिकाणी आम्ही तिघेही एकत्र होतो. या निवडणुकीत सर्वच प्रकारची समीकरणे दिसून आली. कारण, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाजप आपल्या मित्रपक्षांना केव्हाच सोडणार नसल्याचेही जोर देऊन सांगितले. आमच्या मित्रांना आमच्यासोबत ठेवण्याचा निर्णय हा सर्वस्वी आमचा आहे. भाजपची ताकद वाढली असली तरी माझे मत आहे की, महाराष्ट्रात आजही आम्हाला दोन्ही मित्रांची गरज आहे. 2029 मध्येही आ्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहोत. आम्ही आमची ताकद वाढवतच राहू. पण ताकद वाढली म्हणून मित्रांना सोडून देणार नाही, असे ते म्हणाले.

