बुलढाण्यात शिंदेसेनेच्या आमदाराची दादागिरी; भ्रष्ट मार्गाचा अवलंब; कारवाई करण्यास पोलिसांचीही चालढकल.
मुंबई/बुलढाणा, दि, २ डिसेंबर..
नगरपालिका निवडणुकीच्या मतदानात सत्ताधारी भाजपा महायुती रडीचा डाव खेळत आहे. निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण बुलढाण्यासह राज्याच्या विविध भागात तरी तसे होताना दिसत नाही. ग्रामीण भागातून गाड्यांमध्ये भरून लोकांना बुलढाण्यात आणून बोगस मतदान केले पण पोलीस व प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली. बोगस मतदान करणारे व त्यांना तसे करावयास लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
नगरपालिकेच्या मतदानावेळी राज्यात अनेक ठिकाणी गैरप्रकार पाहण्यास मिळाले. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बुलढाण्यात ग्रामीण भागातून गाड्या भरून बोगस मतदार आणण्यात आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार पकडल्यानंतर स्थानिक आमदाराच्या लोकांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि पोलिसही किरकोळ कारवाई करतो असे सांगतात, ही लोकशाहीची थट्टा आहे. सत्ताधारी किती भ्रष्ट आहेत व गुंडगिरी करतात हे त्यांनी आज पुन्हा दाखवून दिले. काँग्रेसला वातावरण पोषक आहे पण सत्ताधारी भाजपा महायुती रडीचा डाव खेळत आहे. सत्ताधाऱ्यांनी काहीही केले तरी काँग्रेसचा विजय होणार असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि केवळ दीड तास उलटत नाही तोच बोगस मतदान करण्यासाठी सुरूवात झाली. प्रभाग क्रमांक १५ साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी तालुका मोताळा येथील एकाला बोगस मतदान केल्यानंतर पकडले. त्याच्यासोबत आणखी एकजण होता. कोथळी, इब्राहिमपूर येथून अनेक लोक बोगस मतदान करण्यासाठी आणण्यात आले. घाटाखालून गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले होते, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव; बुलढाण्यात सत्ताधारी पक्षाकडून बोगस मतदान, कठोर कारवाई करा: हर्षवर्धन सपकाळ

