क्षमता-वृद्धी, संघटनात्मक विकास आणि परिणामाधारित फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी प्रशिक्षण
पुणे: ग्रामीण भागातील विद्यार्थी व स्थलांतरीत युवकांसाठी कार्यरत ‘समावेश’ संस्थेने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) बंगळुरूच्या ‘एनएसआरसेल’मार्फत वर्षभराचे इन्क्युबेशन यशस्वीपणे पूर्ण केले हे. हा एक मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम असून, यामध्ये संस्थेची क्षमता-वृद्धी, संघटनात्मक विकास आणि परिणामाधारित फ्रेमवर्क विकसित करण्यावर भर दिला गेला. त्यातून संस्थेच्या कार्याची व्याप्ती आणि प्रभाव अधिक परिणामकारक होणार आहे.
कागदपत्रांची पूर्तता, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि उच्च शिक्षणातील प्रवेश या तीन मुद्द्यांवर ‘समावेश’ संस्थेचे काम केंद्रित आहे. गेल्या वर्षभरात (२०२४–२५) ११३० हून अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे शैक्षणिक मार्गदर्शन, २५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या, ५०० पेक्षा अधिक तरुणांना आवश्यक कागदपत्रांची पूर्ततेसाठी सहाय्य केले आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांत शिष्यवृत्तीवर जाण्यासाठी मार्गदर्शन केले गेले. याची दखल घेत आयआयएम बंगळुरूच्या ‘एनएसआरसेल’च्या इन्क्युबेशनसाठी ‘समावेश’ची निवड केली गेली.
याबाबत बोलताना ‘समावेश’चे संस्थापक ॲड. प्रविण निकम यांनी सांगितले की, सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या ‘समावेश’ला या उपक्रमामुळे अधिक बळकटी मिळाली आहे. ‘आयआयएम’ने आम्हाला १२ महिन्यांसाठी मार्गदर्शन केले. संस्थेचे फ्रेमवर्क, उपक्रमाची बांधणी, संस्थेच्या कामाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने करावयाच्या गोष्टी याविषयी शिकता आले. मूलभूत विषयांवर काम करणाऱ्या आठ संस्थांची या इन्क्युबेशनसाठी निवड करण्यात आली होती. त्यात ‘समावेश’चा समावेश होता. या संस्थेचे सहाय्य आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच ‘समावेश’ला होईल. अधिक सजगतेने आणि जागरूकतेने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
‘समावेश’विषयी बोलताना ॲड. प्रविण निकम म्हणाले, “२०११ मध्ये पुण्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी स्थलांतर झालेल्या काही तरुण युवकांनी ग्रामीण भागातील युवकांच्या उच्च शिक्षणातील समस्या जाणून सुरू केलेला हा सामाजिक उपक्रम आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. विविध संधी, त्यासाठी असणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा किंवा मग विविध करिअरच्या वाटा निवडत असताना साह्यभूत असणाऱ्या शिष्यवृत्त्या आणि त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे याविषयी स्थलांतरित युवकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे त्यांना चांगल्या विद्यापीठांमध्ये शिकता येत नाही. या अशा सर्व प्रश्नांवर उपाय म्हणून ‘समावेश’ कडून तीन वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत काम केले जाते.

