गांधर्व महाविद्यालय, पुणे आयोजित वि. वि. द. स्मृती समारोहाची सांगता
पुणे : भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या तिसऱ्या पिढीतील कलाकारांनी गायन, वादन आणि नृत्य कलेचा वारसा जपत, तो पुढे नेत अभिजात परंपरेचे आश्वासक दर्शन घडविले.
निमित्त होते भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि गांधर्व महाविद्यालय, नॉर्थ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय वि. वि. द. स्मृती संगीत समारोहाचे. शनिवार आणि रविवारी गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात ‘परंपरा’ या समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे यंदाचे 26वे वर्ष होते. समारोहाला ज्येष्ठांसह युवा पिढीनेही मोठ्या संख्येने हजेरी लावत अभिजात शास्त्रीय संगीताविषयीची असलेली गोडी दर्शविली.
महोत्सवाची सुरुवात ख्यातनाम गायक व संगीततज्ज्ञ पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे नातू अभेद शौनक अभिषेकी यांच्या गायनाने झाली. अभेद यांनी राग श्याम कल्याणमधील रामाश्रय झा रचित दोन बंदिशी सादर केल्या. गंभीर परंतु मधुर समजल्या जाणाऱ्या या रागाचे सौंदर्य त्यांच्या गायनातून उमटले. त्यानंतर त्यांनी राग अभोगीमधील एक रचना सादर केली.
यानंतर ज्येष्ठ कथक नृत्यगुरू पंडिता मनिषा साठे यांची नात सर्वेश्वरी साठे यांनी नृत्याविष्काराची सुरुवात तेजस्विनी साठे यांनी रचलेल्या शिवधृपदाने केली. मनिषा साठे यांच्या नृत्यशैलीची खासियत दर्शविणारा झपताल सादर करून तीश्र, चतश्र जातीचा तत्कार, फर्माईशी चक्रदार परण, राधा परण सादर केले. दादा गुरू पंडित गोपीकृष्ण यांची पारंपरिक रचना, शांभवी दांडेकर यांच्याकडून आत्मसात केलेले नृत्य यासह अभिनय दर्शविणारे नरसिंह अवताराचे सादरीकरण रसिकांना विशेष भावले.
रविवारच्या सत्राची सुरुवात सारंग कुलकर्णी यांच्या सरोद वादनाने झाली. त्यांनी नटभैरव रागात पारंपरिक पद्धतीने आलाप जोड सादर करत रूपक व दृत तीन तालातील दोन बंदिशींचे सौंदर्य उलगडताना रागाची मांडणी व बारकावे वादनातून ऐकविले.
पंडित राम मराठे यांची परंपरा जपत प्राजक्ता मराठे बिचोलकर यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात राग कोमल रिषभ आसावरीने केली. त्यानंतर जौनकली या जोड रागाचे सौंदर्य उलगडत आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना भुरळ घातली.
सायंकाळच्या सत्राची सुरुवात पंडित सुचेता भिडे-चापेकर यांची नात सागरिका पटवर्धन यांच्या नृत्याविष्काराने झाली. गणेशवंदना, पंचजाती आलारिपू सादर केल्यानंतर तिने मराठी शब्द आणि कर्नाटक नृत्यशैलीचा अनोखा संगम दर्शविणारी गणेशाच्या तांडव नृत्याची रचना सादर केली. शहाजी राजे भोसले रचित ‘पाहिले कृष्णा’ या रचनेवर सुंदर नृत्य करून ‘सांगती खोटे त्या गवळणी’ या नृत्यगंगेतील रचनेवर नृत्याविष्कार दर्शविला. ‘अरसिक किती हा शेला’ या नाट्यपदावर साकारलेली नृत्यरचना रसिकांना भावली. ‘गोप-गोपीका-कृष्ण-यशोदा’ यांच्यातील अनोख्या प्रेमसंबंधावरील रचना दर्शविताना तिने आपल्या नृत्याभिनय कौशल्याचे दर्शन घडविले.
देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचा संगीत वारसा जपणाऱ्या शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी दातार-कुलकर्णी यांच्या जुगलबंदीने कार्यक्रम अधिक खुलत गेला. त्यांनी राग भूपमधील पणजोबा भास्करबुवा बखले यांच्या हस्ताक्षरात जपलेल्या ‘सुने बोल बोलत नाही’, ‘झांज मंदिरवा बाजे’ या बंदिशी प्रभावीपणे सादर केल्या.
‘परंपरा’ समारोहाची सांगता भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा वारसा जतन करणारे त्यांचे नातू विराज श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने झाली. त्यांनी मालकंस रागातील ‘पग पग लागन रे’, ‘मुख मोड मोड मुस्कात जात’ या बंदिशी सादर करून सादरीकरणाची सांगता ‘अगा वैकुंठिच्या राया’ या प्रसिद्ध भक्तीरचनेने केली.
कलाकारांना स्वरूप दिवाण, सिद्धेश बिचोलकर, यशवंत थिटे, अमेय बिच्चू, अविनाश दिघे (संवादिनी), समीर पुणतांबेकर, प्रणव गुरव, गीत इनामदार, आशय कुलकर्णी, कौशिक केळकर, स्वप्नील भिसे, (तबला), अर्पिता वैशंपायन (गायन), सुनील अवचट (बासरी) यांनी साथसंगत केली.
वसंत दत्तात्रय पलुस्कर, इंद्रनील चितळे, प्रसाद नगरकर, मृदुला दाबके-जोशी, इन्कम टॅक्सचे प्रिंसिपल कमिशनर अभिनय कुंभार, रवींद्र आपटे, आरती आपटे, गौरी शिकारपूर, राजेंद्र जावळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य पंडित प्रमोद मराठे आणि उपप्राचार्या परिणिता मराठे यांनी केले. सूत्रसंचालन मंजिरी धामणकर, निरजा आपटे यांनी केले

