मुंबई- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ताण-तणाव वाढत असताना, मतमोजणीच्या तारखेबाबत आता मोठा संभ्रम निर्माण दूर झाला आहे. सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल, असे सांगितले होते. मात्र काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने आयोगाने आपल्या कार्यक्रमात बदल करत, ज्या ठिकाणी वाद सुरू आहे, तेथे 20 डिसेंबर मतदान व 21 डिसेंबरला निकाल असा नवीन आदेश देऊन परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली होती. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार उद्याची मतमोजणी रद्द करण्यात आली आहे. आता 21 डिसेंबरलाच सर्व ठिकाणचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे.
खंडपीठाने सोमवारच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या वकिलांना थेट विचारणा केली होती, सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल 21 डिसेंबरलाच देता येतील का? न्यायालयाने विचारलेल्या या प्रश्नामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले होते. आयोगाच्या वकिलांनी मात्र यावर तात्काळ उत्तर न देता, आज दुपारी यासंदर्भातील निवेदन सादर करू असे सांगितले होते. त्यानुसार आता न्यायालयाने सर्वच ठिकाणचा निकाल आता 21 डिसेंबरलाच लागणार आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व तयारी पूर्ण केल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयाकडे सादर केले होते. मतदान असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये यंत्रणा केंद्रावर पोहोचली असून, कर्मचाऱ्यांनी आपली तयारी दाखवली आहे. त्यामुळे मतदान थांबवणे योग्य नाही, असे मत न्यायालयाने स्पष्ट केले होते. तथापि निकालाची तारीख पुढे ढकलल्यास जनतेच्या मनातील संभ्रम आणि राजकीय तणाव यावर अधिक परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षणही न्यायाधीशांनी नोंदवले होते. त्यानुसारच न्यायालयाने आजचा निर्णय दिला आहे.
दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 8 ते 10 वर्षांनंतर होत असल्याने मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आज राज्यातील 264 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी मतदानाची वेळ असून, यासाठी 12 हजार 316 मतदान केंद्रांवर 62 हजार 108 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी पोलिस दलाचा मजबूत ताफा तैनात आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये मतदारांचा उत्साह पाहायला मिळत असून, कोणाचा झेंडा सर्वाधिक उंच जातो हे पाहण्यासाठी साऱ्या राज्याचे लक्ष मतपेटीकडे लागले आहे.
मतमोजणीचा दिवसच निश्चित नसल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये बेचैनी
मतमोजणीचा दिवसच निश्चित नसल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये मात्र बेचैनीचे वातावरण होते. मतदारांनी दाखवलेला विश्वास नेमका कधी उघड होणार? निवडणूक आयोग पुन्हा कार्यक्रमात बदल करणार का? न्यायालयाचा आदेश कोणत्या दिशेने वळणार? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत राजकीय तणाव वाढत गेला. मात्र, आता अपेक्षेप्रमाणेच सर्वच निकाल लांबणीवर पडला आहे.

