:संजय राऊत म्हणाले-लोकशाहीची ऐशी की तैशी? वैभव नाईक यांचे देखील गंभीर आरोप
मालवण- नगरपालिका निवडणुकीत नुकतेच भाजपवर पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष वाढला. परंतु आता स्वतः शिंदे गटावरच मतदारांमध्ये पैसे वाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक तसेच खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते नीलेश राणे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करत मोठा दावा केला असून, त्यामुळे मालवणच्या निवडणूक राजकारणात नवे वादळ उठले आहे.
वैभव नाईक यांच्या मते, काही दिवसांपूर्वी मालवण दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्यासोबत पैशांच्या बॅगा घेऊन आले होते. हा पैसा कार्यकर्त्यांमार्फत मतदारांपर्यंत पोहोचवला गेला, असा त्यांचा आरोप आहे. त्यांनी व्हिडीओ दाखवत असा दावा केला की शिंदे यांच्या अंगरक्षकांनी कॅमेरापासून लपवत मोठ्या बॅगा उतरवल्या. हे दृश्य म्हणजे राजकीय भ्रष्टाचाराचे प्रत्यक्ष उदाहरण असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. त्यांनी हे पैसेच नीलेश राणे यांनी निवडणूकपूर्व रात्री मतदारांमध्ये वाटले, असा दावा केला आहे. मतांसाठी पैसा वापरण्याचे हे तंत्र लोकशाहीचा अपमानच आहे, अशी टीका त्यांनी केली.
भाजपवर पैसे वाटपाचे आरोप करत नित्यनेमाने कारवाईची मागणी करणारे नीलेश राणे यांच्यावरच आता बोट दाखवले जात आहे. काही दिवसांपूर्वी राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी धाड टाकून 25 लाखांची रोकड जप्त केल्याचा दावा केला होता. तसेच भाजपच्या उमेदवाराच्या जातप्रमाणपत्रावरही त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोपही केले होते. परंतु आता वैभव नाईक म्हणतात की शिंदे-सेनेचेही हात स्वच्छ नाहीत. सत्तेचा गैरवापर करून पैसा कमवायचा आणि त्याच पैशाने सत्ता टिकवायची, हे त्यांचे धोरण झालं आहे.
नाईक यांनी पुढे सांगितले की, राज्यातील सरकारी खाती, प्रकल्प, ठेके यामध्ये भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशाचा गैरवापर होतो. त्यातून निर्माण झालेला पैसा, निवडणुकांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येतो. जनतेला गोंधळात टाकून सत्ता मिळवण्याचा खेळ सर्वांसमोर उघड झाला आहे. त्यांनी मालवणकरांना आवाहन केले की, पैशाची लाट पाहून फसू नका. आपल्या भविष्याचा विचार करून मतदान करा. भ्रष्टाचाराला समर्थन दिल्यास तोच पैसेवाला गट आपला आवाज दाबेल.
भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर दिल्याचा संजय राऊत यांचा आरोप–शिंदे मालवणात आले येताना बॅगेतून काय आणले? असा प्रश्न संजय राऊत यांनीही उपस्थित केला आहे. मालवणात भाजपाच्या थैल्याना बॅगेने उत्तर दिल्याचा आरोप राऊत यांनी केला. या आधी नाशिक मध्ये ही बॅगा उतरल्याच होत्या. लोकशाहीची ऐशी की तैशी? जय महाराष्ट्र. अशा खोचक शब्दांत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

