पुणे- राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत लक्षवेधीद्वारे लंपी त्वचा रोगामुळे (एलएसडी) बाधित झालेल्या पशुपालकांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. पुण्यासह महाराष्ट्रात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने पशुपालकांना गंभीर आर्थिक फटका बसला आहे. त्यांनी पशुवैद्यकीय सुविधा सक्षम करण्याचीही मागणी केली.
डॉ. कुलकर्णी यांनी संसदेत सांगितले की, राज्यात आतापर्यंत सुमारे ९८ हजार २३० गायी-म्हशी लंपीने संक्रमित झाल्या आहेत, त्यापैकी अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने, या रोगामुळे दुग्ध उत्पादनात घट झाली असून हजारो पशुपालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
सरकारने लसीकरण मोहीम राबवली असली तरी, ग्रामीण भागात आरोग्य पायाभूत सुविधा, औषध पुरवठा आणि पशुवैद्यकीय सेवांची कमतरता आहे. यामुळे पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
त्यांनी लंपी त्वचारोगामुळे नुकसान झालेल्या पशुपालकांना तत्काळ भरपाई व मदत देण्याची मागणी केली. तसेच, ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय रुग्णालये, औषधसाठा, मोबाईल व्हेटनरी युनिट्स आणि लस पुरवठा साखळी सक्षम करण्यावर भर दिला.
पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटरिनरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट्सला देशी लसींच्या उत्पादनासाठी केंद्राकडून तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य मिळावे, जेणेकरून भविष्यात राज्य स्वयंपूर्ण होईल, अशी सूचनाही त्यांनी केली. यासोबतच, केंद्र व राज्य शासनाने मिळून राष्ट्रीय निगराणी तंत्र आणि आपत्ती प्रतिसाद प्रणाली विकसित करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
हा विषय केवळ पशुसंवर्धनाशी संबंधित नसून, पशुपालकांच्या आर्थिक सुरक्षेशी निगडित असल्याने केंद्र सरकारने यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. कुलकर्णी यांनी केली

