पुणे-१ डिसेंबर २०२५:हिंजवडी आयटी पार्क परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन चिमुकल्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला. आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी कंपनीची बस अनियंत्रित होऊन थेट फूटपाथवर घुसल्याने हा अपघात घडला. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये अर्चना देवा प्रसाद (वय ८) आणि सूरज देवा प्रसाद (वय ६) यांचा समावेश आहे. गंभीर जखमींमध्ये प्रिया देवा प्रसाद (वय १८) आणि पादचारी अविनाश चव्हाण यांचा समावेश आहे. बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. मृतदेह औंध रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
अपघातात प्रिया देवा प्रसाद (वय १८) आणि अविनाश हरिदास चव्हाण (वय २६) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. विमल राजू ओझरकर (वय ४०) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
बस चालक नागनाथ राजाभाऊ गुजर (वय ३६, रा. भोसरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो नशेत बस चालवत असल्याचा संशय आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दोन मुलांच्या मृत्यूला दुजोरा दिला असून, पीडितांची पार्श्वभूमी आणि घटनेचे कारण तपासले जात असल्याचे सांगितले. चालकाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.
हिंजवडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कंपन्या बंद झाल्यानंतर सायंकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होते. या अपघातामुळे नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

