पुणे, दि.1: महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन नागरिकांना विविध विभागाच्या अधिसूचित सेवा विहीत कालावधीत प्रशासनाने उपलब्ध करुन द्यावेत, या कायद्याबाबत अधिकाधिक नागरिकांना माहिती होण्यासह त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्याच्यादृष्टीने व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता प्रशासनाला सोबत घेवून महिला बचत गटाने मेळावे आयोजित करावेत, असे प्रतिपादन राज्य सेवा हक्क आयोगाच्या पुणे विभाग आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी केले.
राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित महिला बचत गट मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या उपसचिव अनुराधा खानविलकर, पुणे महानगरपालिकेचे प्रभाग क्र. 3 चे समाजसेवक संदीप कांबळे, आपले सरकार केंद्राचे जिल्हा समन्वयक संदीप खोत तसेच शहरातील महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.
श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, राज्यात लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ हा कायदा दिनांक २८ एप्रिल, २०१५ पासून अंमलात आलेला आहे. शासनाच्या 38 विभागांकडून 1 हजार 212 अधिसूचित लोकोपयोगी सेवा केल्या आहेत. या कायद्यामुळे नागरिकांना विहीत मुदतीत प्राप्त करुन घेण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झालेला आहे. या कायद्याखाली अधिसूचित करण्यात आलेल्या ऑनलाइन सेवांची अद्ययावत माहिती राज्य शासनाच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्जदारास सेवा विहीत वेळेत मिळाल्यास आयुक्त, राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, ३ रा मजला, छत्रपती शिवाजीनगर, घोले रोड, क्षेत्रीय कार्यालय, महानगरपालिका शिवाजीनगर, पुणे येथे तीसरे अपील करता येईल. नागरिकांना मिळणाऱ्या सेवांबाबत अधिक माहितीकरिता राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती कुलकर्णी यांनी केले.
श्रीमती खानविलकर यांनी अर्जदांराना सेवांचा लाभ घेतांना अडअडचणी आल्यास राज्य सेवा हक्क आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, आयोगाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही श्रीमती खानविलकर म्हणाल्या.
श्री. कांबळे म्हणाले, पुणे महानगरपालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे, याकरिता नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. कांबळे म्हणाल्या.
यावेळी बचत गटाच्या सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले. यामध्ये त्यांना काम करतांना येणांऱ्या शंकाचे निरसन करण्यात आले.

