निवडणूक आयोगाचा ‘पोरखेळ’ सुरू आहे-आचारसंहिता उरली आहे का?मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचार सभांमध्ये उघडपणे प्रलोभने दाखवत आहेत– निवडणूक आयोग हे सरकारच्या हातचे बाहुले बनले आहे.
सातारा-“अमेरिकेत सध्या गाजत असलेल्या ‘एपस्टाईन फाईल्स’ची माहिती बाहेर आल्यास भारताच्या राजकारणात मोठा भूकंप होऊ शकतो. या राजकीय उलथापालथीत कदाचित येत्या महिनाभरात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झालेला पाहायला मिळेल,” असे सूचक आणि खळबळजनक विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आणि सोशल मीडियावरील एका ट्विटमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चांना उधाण आले आहे. सोमवारी कराड येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले की, हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. अमेरिकेत मोठा उद्योगपती. जेफ्री अॅमस्टिन त्याचे नाव आहे. त्या माणसाबद्दलचा हा विषय आहे. त्याने कायदा मोडला. त्याने खूप बेकायदेशीर कारवाया केल्या. त्यात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गुंतवायचे आणि भानगडी करायला लावायच्या असा तो विषय आहे. सर्व मोठ्या राजकीय नेत्यांची नावे अमेरिकेत आली आहेत. त्यात राष्ट्रपती ट्रम्प यांचे देखील नाव आहे. त्यामुळे कदाचित ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागेल. तिकडे निवडणूक आयोगाचे फार कडक निकष आहेत. ट्रम्प यांनी राजीनामा देणे हा त्यांचा विषय आहे.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, अमेरिकेची संसद ट्रम्प यांच्या मागे लागली आहे. नावे खुले करण्यास सांगत आहे. पण ट्रम्प करत नाहीत. कारण अनेक लोक अडचणीत येणार आहेत. संसद ट्रम्प यांच्या पाठिमागे सहा महिन्यापासून लागली आहे. 10 हजार कागदपत्रे संसदेने ताब्यात घेतले आहेत. संसद ही कागदपत्रे उघड करू शकते.
दरम्यान, ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एक व्हिडिओ केला आहे. त्या व्हिडिओमध्ये देखील ती कागदपत्रे लवकरच मला मिळतील असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये उलतापालथी होण्याची शक्यता आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
या विषयासंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केले आहे. त्यामुळे “नेमका कोणता मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, “ते आता तुम्हीच शोधा,” असे मिश्किल उत्तर देत चव्हाण यांनी सस्पेन्स कायम ठेवला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील गोंधळावरून चव्हाण यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. “निवडणूक आयोगाने सगळा गोंधळ घालून ठेवला आहे. जर तयारी नव्हती, तर निवडणुका घेण्याची गडबड कशासाठी केली? ऐनवेळी निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, हा सर्व पोरखेळ सुरू आहे. या गोंधळाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे,” अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रचार सभांमध्ये उघडपणे प्रलोभने दाखवत आहेत, हे आचारसंहितेत बसते का? या प्रश्नावर बोलताना चव्हाण संतापले. ते म्हणाले, “आचारसंहिता आता उरलीच कुठे आहे? निवडणूक आयोग हे सरकारच्या हातचे बाहुले बनले आहे. त्यामुळे सत्ताधारी मनमानी करत आहेत.”

