स्व-रूपवर्धिनीला यंदाचा संपदा समाजकल्याण पुरस्कार प्रदान ; संपदा सहकारी बँक लि. तर्फे आयोजन
पुणे : ईश्वराने मला दिले, ते मी समाजाला दिले नाही तर ते सडून जाईल. आवश्यकता तिथे सेवा आणि समस्या समजून सेवा करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण गंगेच्या पाण्यातून पाणी घेऊन तिथेच अर्घ्य देतो. त्याप्रमाणे समाजातून निर्माण झालेला पैसा समाजासाठी खर्च करायचा असतो. समाज हा विश्ववंद्य आणि विश्वगुरू व्हावा, हा सेवेचा उद्देश असायला हवा, असे मत भारत-भारतीचे संस्थापक अध्यक्ष विनय पत्राळे यांनी व्यक्त केले.
सेवाभावी संस्थांच्या कार्याचा सन्मान करून ते महत्कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने संपदा सहकारी बँक लि. तर्फे यंदाचा संपदा समाजकल्याण पुरस्कार स्व-रूपवर्धिनी संस्थेला प्रदान करण्यात आला. स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे आयोजित कार्यक्रमात स्व-रूपवर्धिनी चे शिरीष पटवर्धन आणि सहकाऱ्यांनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रुपये ५१ हजार, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा दुसरे वर्ष होते.
कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळ अध्यक्ष ऍड.एस.के.जैन, संपदा सहकारी बँकेचे अध्यक्ष सी.ई.अश्विनीकुमार उपाध्ये, उपाध्यक्ष सी.ए. महेश लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मुकुंद भालेराव यांसह संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होते. अनेक दशके पुण्यातील वंचित समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल स्व-रूपवर्धिनी संस्थेला पुरस्काराने गौरविण्यात आले.
ऍड.एस.के.जैन म्हणाले, बँकेकडून कर्ज मिळते, तर कर्ज घ्यावे आणि नंतर कर्जमुक्ती मागावी, हा ट्रेंड झाला आहे. सहकारी बँका चालविणे किती कठीण आहे, हे माहीत आहे. बँकेची वृद्धी कमी जास्त झाली, तरी देखील समाजासाठी काम होणे महत्वाचे आहे. त्याकरिता वस्त्यांमध्ये आर्थिक साक्षरता होणे गरजेचे आहे.
पुरस्काराला उत्तर देताना शिरीष पटवर्धन म्हणाले, सामान्य माणसाला अर्थ संचय करण्यासाठी संकलन, संवर्धन आणि संरक्षणाची सुविधा बँक देते. तसेच बचतीला बळ देण्याचे कामही केले जाते. संपदा सहकारी बँकेप्रमाणेच स्व-रूपवर्धिनीचे कार्य सुरु असून समाजातील बुद्धिवंतांना शोधून त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे.
सी.ई.अश्विनीकुमार उपाध्ये म्हणाले, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंदा अर्थसाक्षरता विषय घेऊन वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. तसेच बँकिंग सोबत पुरग्रस्ताना मदत देखील मोठ्या प्रमाणात देण्यात आली. बँकेला अ ऑडिट वर्ग मिळाला असून सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. शैलेश परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश सरदेशपांडे यांनी आभार मानले.

