पुणे-वंचित विद्यार्थ्यांसाठी कार्यरत एकलव्य विद्या संकुल या आश्रमशाळेस राघवेंद्र बाप्पु मानकर मित्र परिवाराच्या वतीने मदत देण्यात आली. ५०० ब्लॅंकेट, २०० किलो धान्य व २५ हजार रोख मदत देण्यात आली.
राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू म्हणून थंडीसाठी उपयोगी कपडे आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शेकडो ब्लॅंकेट जमा झाले होते. याचे वस्तूंचे गरजूंना वाटप करण्याच्या उपक्रमाला आज सुरुवात करण्यात आली. यमगरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील वंचित विकास प्रतिष्ठान संचलित एकलव्य विद्या संकुल या संस्थेस मदत ५०० ब्लॅंकेट, २०० किलो धान्य, २५ हजार रुपये रोख मदत देण्यात आली. तुळजापूर येथील संस्थेच्या संकुलात हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले,विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समर्पण भावनेने काम करणाऱ्या संस्थांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढेही या संस्थेच्या पाठीशी कायम उभे राहू.
या यमगरवाडी प्रकल्पाचे समन्वयक राजेंद्र कुलकर्णी म्हणाले, बाप्पु मानकर यांचे या उपक्रमाचे अनुकरण सर्वांनी करावे, आपला वाढदिवस अथवा इतर आठवणींच्या दिवशी संस्थेच्या मुलांसाठी मदत केल्यास हे कार्य अधिक जोमाने पुढे जाईल.
यावेळी यमगरवाडी प्रकल्पाचे पुणे येथील समन्वयक राजेंद्रजी कुलकर्णी, रा. स्व. संघाच्या समर्थ भारतचे विनोद खरे, एकलव्य विद्या संकुल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कोल्हटकर सर, वसतिगृह समन्वयक फुलाजी ताटीकुंडलवार, विद्यार्थी, सहकारी व राघवेंद्र बाप्पु मानकर मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
यमगरवाडी प्रकल्पाविषयी
एकलव्य विद्या संकुल हे यमगरवाडी प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते. यमगरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकलव्य विद्या संकुल चालवले जाते. येथील आश्रमशाळेत चालणारे कार्य आणि त्यासाठी घेतले जाणारे परिश्रम मोलाचे आहेत. समर्पित भावनेने केले जाणारे कार्य समाजात किती मोठा बदल घडवू शकते याची प्रचिती येथे भेटीदरम्यान येते.
१९९३ साली लातूर भूकंपाच्या काळात सेवाकार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी भटक्या-विमुक्त समाजाची परिस्थिती पाहून, संघपरिवाराच्या माध्यमातून या संस्थेची वाटचाल सुरू केली. मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या या भटक्या समाजाच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे जीवनमान शिक्षणाच्या माध्यमातून उंचावण्याचा संकल्प संस्थेने केला. सुरुवातीला हे विद्यार्थी शिकण्यासाठी तयार होणेही अवघड असताना, अवघ्या २४ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली संस्था आज ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.
भटक्या-विमुक्त समाजातील ५२ पैकी ३८ जनजातींचे हजारो विद्यार्थी येथे शिकून, समाजात सन्मानाची नोकरी करीत आहेत. अनेक विद्यार्थी आज सरकारी अधिकारी, अभियंते आणि डॉक्टर बनले आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर येथे विशेष लक्ष दिले जाते. येथील शेकडो विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये देशपातळीवर विजयी झाले आहेत.

