शिंदेंचे 35 आमदार फुटतील-शिंदे गटाची गुलाबो म्हणत हेटाळणी
मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत आजारपणानंतर आज पुन्हा पत्रकारांना सामोरे गेले. त्यात त्यांनी भाजपसह शिंदे गटावर सडकून टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच एकेदिवशी शिंदे गटाचा कोथळा बाहेर काढतील असा दावा केला. यावेळी त्यांनी आपल्या प्रकृतीवरही भाष्य केले. माझी तब्येत सुधारत आहे. उपचार कठोर असतात. आजापेक्षा उपचार भयंकर असतात, असे ते म्हणालेत.
संजय राऊत आजारपणामुळे गत काही दिवसांपासून सार्वजनिक जिवनापासून दूर होते. बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सत्ताधारी महायुतीवर चौफेर हल्ला चढवला. मी एकनाथ शिंदेंची शिवसेना असे म्हणण्यास तयार नाही. एकदिवस अमित शहाच शिंदेसेनेचा कोथळा बाहेर काढतील हे लिहून घ्या. त्यांनी आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार, कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढला जाईल.
शिंदेचे 35 आमदार फुटतील. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेसोबत केले, अगदी त्याच पद्धतीने शिंदेंचे आमदार फोडण्याचे काम व्यवस्थितपणे सुरू आहे. रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची नेमणूक त्यासाठीच करण्यात आली आहे. आपण हे राजकारण समजून घेतले पाहिजे. यांना (शिंदे) वाटत असेल की दिल्लीचे 2 नेते आमच्या पाठीशी आहेत, पण ते कुणाचेही नाहीत, ते कुणाच्याही पाठिशी नाहीत. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसताना मागेपुढे पाहिले नाही, मग हे शिंदे कोण? शिंदे तर त्यांनीच पाळलेले आहे.
शिंदे यांचा पक्ष आधीच फुटलेला आहे. हा अमित शहा यांनी निर्माण केलेला गट आहे, हा अमित शहांचा पक्ष आहे, शिंदेंचा पक्ष नाही. यांनी (शिंदे) कधी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात? हे कधी शिवसेनेसाठी तुरूंगात गेले? कधी आंदोलने केली? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती राऊत यांनी या प्रकरणी केली.
संजय राऊत यांनी यावेळी ठाकरे बंधूंच्या भेटीवरही भाष्य केले. तसेच मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसलाही धारेवर धरले. ते म्हणाले, राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची एक भेट झाली. त्यात राज यांनी उद्धव यांना एक प्रेझेंटेशन दाखवले. त्यांचे जे काही चालले आहे ते अतिशय उत्तम चालले आहे. राज ठाकरे सोबत आल्यामुळे भाजपचा पराभव होईल. भाजप हा मुंबईचा एक नंबरचा शत्रू आहे. मुंबई अदानींच्या घशात घातली जात आहे. हे थांबवायचे असेल तर राज ठाकरे यांना सोबत घेणे आवश्यक आहे.
या प्रकरणी एकनाथ शिंदे काय म्हणतात ते महत्त्वाचे नाही. काँग्रेसने आमच्यासोबत असणे ही आमची भूमिका आहे. पण बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असेल, तर त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात आमची हरकत नाही, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी यावेळी आपल्या तब्येतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, मी एका महिन्याहूनही अधिक काळापासून कैदखान्यात आहे. घरच्या व रुग्णालयाच्या. उद्धव ठाकरे यांचेही माझ्यावर बारीक लक्ष आहे. मी कुठे बाहेर पडतोय का? हे ते पाहतात. आत्ताही त्यांची परवानगी नाही. पण माझ्या तब्बेतीत हळूहळू सुधारणा होत आहे. अजूनही सुधारणा होईल. उपचार कठोर असतात. आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. डिसेंबरनंतर मी पूर्णपणे बराई होऊन येईन. ते निश्चितच होईल. रेडिएशनचा भाग संपला आहे. डॉक्टरांची टीम चांगले काम करत आहे. प्रकृती हळूहळू सुधारत आहे. तुरुंगात असतानाच हा आजार सुरू झाला. मी बरा असतो तर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरलो असतो.
संजय राऊत यांनी यावेळी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवडणुकीत होणाऱ्या लक्ष्मीदर्शनाच्या विधानाचाही समाचार घेतला. या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख गुलाबो गँग म्हणून केला. ते म्हणाले, शिंदे गटाच्या गुलाबो गँगने 1 डिसेंबरला लक्ष्मीदर्शन होणार असल्याचे सांगितले आहे. निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे. काही ठिकाणी एका मतासाठी 10 ते 15 हजार असे लक्ष्मीदर्शन होत आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत पैशांचा एवढा खेळी कधीही झाला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार या निवडणुका लढवतच नव्हते.
स्थानिक पातळीवर या निवडणुका होत होत्या. पण आता 5-6 हेलिकॉप्टर्स, खासगी विमाने हे सर्वकाही पहावयास मिळत आहे. आम्ही या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आहेत. लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत. तसे मुळीच नाही. या राज्याची निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. मागच्या 405 वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे घडले आहे. सध्याच्या घडीला तू मोठा की मी मोठा अशी स्पर्धा तीन सत्ताधारी पक्षांत सुरू झाली आहे, असे संजय राऊत म्हणाले.
मोदी, शिंदे, फडणवीसांकडून तब्येतीची चौकशी-संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आदी सर्वांनी आपल्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहितीही यावेळी दिली. मी आजारी असताना देवेंद्र फडणवीस यांनी माझी चौकशी केली. मदतीचे आश्वासन दिले. नरेंद्र मोदींनीही माझी चौकशी केली. मला फोन आला होता. एकनाथ शिंदेंनीही फोन केला होता. कारण, राजकारणापलिकडे नाती जपायची असतात, असे ते म्हणाले.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीत होणाऱ्या सुधारणेवर आनंद व्यक्त केला आहे. संजय राऊत बरे झाले याचा मला आनंद आहे. त्यांनी त्यांचे काम करावे. आम्ही आमचे काम करतो. संजय राऊत रोज काय बोलतात त्याला उत्तर देणे मी महत्त्वाचे समजत नाही, असे ते म्हणाले.

