शिंदेंची भेट टाळली…आयोग कुणाचा सल्ला घेत आहे याची कल्पना नाही
छत्रपती संभाजीनगर- राज्य निडवणूक आयोगाचा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. आयोग कोणता कायदा काढतंय किंवा तो कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूकच पुढे ढकलायची हे अतिशय चुकीचे आहे, असे ते म्हणालेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट टाळली. तसेच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर झालेल्या छापेमारीवरही भाष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रचारसभेला जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ते म्हणाले, माझ्या मते निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येकवेळी कुणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणुका पोस्टपाँड होतील. असे आजवर कधीच झाले नाही.
फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोग कुठला कायदा काढतंय किंवा आयोग कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण मी जो कायदा पाहिला, जेवढा माझा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशीही बोललो, या सर्वांचे मत आहे की, अशा पद्धतीने या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून पुढे ढकलता येत नाहीत. हे अतिशय चुकीचे आहे. पण निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यांना निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. पण माझे मत आहे की, निवडणूक आयोगाने निवडणुका लांबणीवर टाकलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे. प्रामाणिकपणे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांवर झालेला हा अन्याय आहे. उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही ती लांबणीवर टाकता, यामुळे त्यांचे श्रम व मेहनत वाया गेली. आता 15 – 20 दिवस त्यांनी पुन्हा प्रचार करायचा. सरकार या प्रकरणी निवडणूक आयोगापुढे सादरीकरण करून हा निर्णय चुकीचा आहे हे सांगेन, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दोघेही छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. पण तिथेही या दोन्ही नेत्यांची भेट झाली नाही. पत्रकारांनी याविषयी फडणवीसांना छेडले असता मी रात्री लवकर आलो व सकाळी लवकर जात असल्यामुळे आमची भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले. माध्यमांना आता दिवसभरासाठी खाद्य मिळाले आहे. पण मी रात्री उशिरा आलो. आज सकाळी 1 तास लवकर जात आहे. कारण, मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या सभेनंतर 1 तास नंतर आहे. त्यामुळे भेट झाली नाही. उद्या होईल, त्याला काय? शेवटी आम्ही दोघेही प्रचारात मग्न आहोत.
आमचे फोनवर रोजच बोलणे होते. त्यामुळे आता भेट झाली किंवा न झाली हा विषय नाही. ते अजून तयार व्हायचेत. मला लवकर निघायचे आहेत. कारण माझ्या सभा लवकर ठेवल्यात. यात कोणती मोठी गोष्ट आहे. तुम्ही चालवा दिवसभर झाली नाही भेट म्हणून, असे फडणवीस हसत म्हणाले.

