पुणे: महानगरपालिका- घनकचरा व पर्यावरण विभाग यांच्या वतीने आज नदी महोत्सव २०२५- स्वच्छ नदी, सुंदर पुणे कार्यक्रमांतर्गत २६३ टन राडारोडा, 11 टन गवत व २o टन कचरा गोळा करण्यात आला.या महोत्सवात नदी स्वच्छता मोहिमेसोबत, ४ पथनाट्य, ड्रम-सर्कल्स, ७ स्टेज सांस्कृतिक कार्यक्रम, नदी संवर्धनाबाबत जनजागृती रॅली, १२ स्वयंसेवी संस्थांचे आणि ५ महानगरपालिकेच्या विभागांचे पर्यावरण विषयक जनजागृती स्टॉल्स, पर्यावरण प्रदर्शने, उद्यान विभागा मार्फत रोपांचे मोफत वाटप व नागरिक सहभागासाठी बुथ अशा प्रकारे पर्यावरणीय बांधिलकीला बळकटी देण्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता. अशा या अनोख्या कार्यक्रमात नागरिकांनी उत्साहवर्धक वातावरणात श्रमदान करून ‘नदी महोत्सव २०२५- स्वच्छ, नदी सुंदर पुणे’ मध्ये मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन सदैव तत्पर आहेच परंतु पुणे शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग व सहकार्य देखील अतिशय महत्वाचे आहे असा संदेश पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला.

नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा River Week म्हणून आणि २ डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील स्वच्छता करणेसाठी “नदी महोत्सव २०२५- स्वच्छ, नदी सुंदर पुणे” कार्यक्रम आज दि. 30 नोव्हेंबर २०२५ रोजी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व पर्यावरण विभागामार्फत आयोजित करण्यात आला. महापालिका आयुक्तांनी सांगितले प्रमाणे ही स्वच्छता मोहीम केवळ स्वच्छता मोहीम नसून एक अनोख्या प्रकारचा महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला ज्यामध्ये नागरिकांना स्वच्छता मोहीमसोबतच एक मुक्त व्यासपीठ देवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
पर्यावरण विभाग उपआयुक्त किशोरी तोडमल- शिंदे यांनी सांगितले की,हा नदी महोत्सव पुणे महानगरपालिका, युवा फॉर अॅक्शन, इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन व इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सकाळी ७.०० ते १०.०० भिडे पूलापासून ते म्हात्रे पूल पर्यंत स्वच्छता मोहीमद्वारे साजरा केला गेला. या मोहिमेत सुमारे ३००० लोक सहभागी झाले यामध्ये शाळा महाविद्यालयाचे विद्याथी, नागरिक, स्वयंसेवीसंस्था, कॉर्पोरेट कंपनीचे कर्मचारी, बँक कर्मचारी, हेल्थ केअर कंपनी, उत्पादक कंपनी, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून २६३ टन राडारोडा, 11 टन गवत व २o टन कचरा गोळा करण्यात आला. नदी स्वच्छतेच्या कामाकरिता ५ JCB, ८ घंटागाडी, ६ कटिंगगाडी, ३ कंटेनर, २ हायवा, १ जटायू, ६ छोटा हत्ती, ५ टिपर, १५ आदर पूनावाला गाडी, ४ ग्लटर इत्यादी यंत्रणा वापरण्यात आली. नदी स्वच्छता कामामध्ये पुणे महानगरपालिकेचे विविध विभाग जसे कि, भवन, उद्यान, मलनिस्सारण, घनकचरा, पर्यावरण, नदी सुधार प्रकल्प, विद्युत, सोशल मिडीया, आरोग्य, रोड, ट्राफिक, सुरक्षा, स्मार्टसिटी, अग्निशामक, जनसंपर्क कार्यालय, वारजे कर्वेनगर, घोले रोड, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ २ इत्यादींच्या मार्फत सहकार्य देण्यात आले. Red FM यांनी नदी महोत्सव २०२५ या कार्यक्रमाची प्रसिद्धी देण्यासाठी सहयोग दिला.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, सचिन्द्र प्रताप सिंग, शिक्षण आयुक्त, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदीप गिल, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), पृथ्वीराज बी पी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि), प्रशांत वाघमारे, शहर अभियंता पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेचे घनकचरा विभागाचे उप आयुक्त अविनाश सकपाळ, पर्यावरण विभागाच्या किशोरी शिदे, परिमंडळ २ चे संतोष वारूळे व महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

