सलग चौदावे खासदार जनसंपर्क सेवा अभियान यशस्वी
पुणे — पुणेकरांनी खासदार म्हणून मला जबाबदारीने, अपेक्षेने निवडून दिले आहे. खासदार म्हणून नागरिकांच्या संपर्कात राहीन, असा शब्द मी दिला होता. खासदार झाल्यानंतर चौदा जनता दरबार यशस्वीरित्या पार पडले असून मी माझा शब्द पाळला आहे, असे पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी सांगितले. या दरबारांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या एकाच छताखाली सोडवता आल्याचे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मोहोळ यांचे चौदावे खासदार जनसंपर्क सेवा अभियान रविवारी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात पार पडले. रास्ता पेठेतील रवींद्र नाईक चौकात झालेल्या या अभियानावेळी खासदार मोहोळ यांच्यासह आमदार सुनील कांबळे, भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख गणेश बीडकर उपस्थित होते. तसेच पुणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस दल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेल्वे, नागरी विमान वाहतूक, सहकार आदी शासकीय यंत्रणांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
‘खासदार झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात खासदार जनसंपर्क सेवा अभियान नावाने मी जनता दरबार सुरू केला. पुणे लोकसभेअंतर्गत येणाऱ्या विधानसभांपैकी एका विधानसभा मतदारसंघात आमचे आमदार व इतर पदाधिकाऱ्यांसह दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा दरबार घेतला जातो. त्याप्रमाणे सलग चौदा महिन्यात चौदा जनता दरबार पार पडले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन फेऱ्या पार पडल्या असून, तीन विधानसभेत तिसरी फेरीही पार पडल्याचे समाधान आहे,’ असे मोहोळ म्हणाले.
खासदार जनसंपर्क सेवा अभियानाची वैशिष्ट्ये
- सर्व शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
- कोणतीही नागरी अथवा वैयक्तिक समस्या थेट मांडण्याची संधी.
- सर्व शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन व मदत
- निम्म्याहून अधिक तक्रारींचा तत्काळ निपटारा.
- उर्वरित समस्यांबाबत अखेरपर्यंत यशस्वी पाठपुरावा.
“नागरिकांना आवश्यक सेवासुविधा, योजना, समस्यांसाठी एकाच छताखाली सेवा मिळावी, हा या अभियानाचा उद्देश आहे. नागरिकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून खासदार जनसंपर्क सेवा अभियानात आपली समस्या नक्की सुटेल, याची खात्री पुणेकरांना पटली आहे.”
मुरलीधर मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री
खासदार, पुणे

