नाशिक: पंचवटी येथील नेहा पवार आत्महत्या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली आहे. महिलेच्या सात पानी चिठ्ठीत नमूद केलेल्या गंभीर बाबींचा अभ्यास करून नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ मधील कलम २(क) आणि २(ख) आता प्रकरणात समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही महत्त्वाची कारवाई शक्य झाली.
नेहा पवार यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कौमार्य चाचणी आणि अंधश्रद्धेचा थेट उल्लेख होता. तरीही सुरुवातीच्या एफआयआरमध्ये या मुद्द्यांचा समावेश नव्हता. त्यानंतर अंनिसने पोलिसांना निवेदन देऊन जादूटोणा विरोधी कायद्याची लागू कलमे तातडीने लावण्याची मागणी केली. तसेच डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि नाशिक पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कठोर कारवाईची विनंती केली.
यानंतर तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे सुपूर्त झाली. तपासादरम्यान आरोपीच्या घरातून जादूटोणेसाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांना मिळाले. तसेच चिठ्ठीत नमूद केलेली कौमार्य चाचणी—जी २०१९ मध्ये गृह विभागाने डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे गुन्हा घोषित केली आहे—ही बाबही तपासासाठी महत्त्वाची ठरली.
सर्व पुराव्यांचा विचार करून पोलिसांनी संबंधित जादूटोणा विरोधी कलमे जोडली. न्यायालयाने पुढील तपासासाठी आरोपींची पोलिस कोठडी ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.
या निर्णायक कारवाईबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. नीलम गोऱ्हे आणि नाशिक पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.

