पुणे-“हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा,” शुक्रवारी दुपारी हॉटेलच्या लँडलाईनवर खणखणलेल्या या एका फोनमुळे कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. या धमकीमुळे पोलिस यंत्रणा आणि बॉम्ब शोधक पथकाची चांगलीच धावपळ झाली. मात्र, हॉटेलची कसून तपासणी केल्यानंतर हा फोन बनावट असल्याचे स्पष्ट झाले आणि हॉटेल प्रशासन व ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, शुक्रवारी (ता. 29) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कोरेगाव पार्क भागातील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलच्या लँडलाईनवर एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत हॉटेल रिकामे करण्यास सांगितले. या प्रकारामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली.
व्यक्तीने धमकी देताच, हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने तत्काळ पुणे पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कोरेगाव पार्क पोलिस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने संपूर्ण हॉटेल परिसर पिंजून काढला, प्रत्येक कोपरा तपासला. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आली नाहीत. अखेर हा खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देण्यासाठी 9832252517 या मोबाइल क्रमांकाचा वापर करण्यात आला होता. पोलिस आता सायबर सेलच्या मदतीने संबंधित कॉलरचे लोकेशन ट्रेस करत असून लवकरच त्याला अटक करण्यात येण्यात असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार मोठी गंभीर समस्या बनली असून पुणे शहरातील गुन्हेगारीही पोलिसांपुढे मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे, पुणे पोलिसांकडूनही सातत्याने सतर्कता बाळगली जाते. त्यातच अशा बनावट फोन कॉल्समुळे पोलिस यंत्रणेवर नाहक ताण येत आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, मात्र सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

