:नीलेश राणे
मालवण -“मी निवडून आल्यापासून भाजप नेत्यांकडून मला वारंवार पक्षात येऊन निवडणूक लढवण्याच्या ऑफर मिळत होत्या. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर केलेले उपकार मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. त्यामुळे मी त्यांना सोडून भाजपमध्ये जाणार नाही,” असा मोठा राजकीय गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी केला आहे. दुसरीकडे, मालवणमधील ‘स्टिंग ऑपरेशन’ प्रकरणी गुन्हा दाखल होताच राणे यांनी पोलिसांना “हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा,” असे उघड आव्हान दिल्याने कोकणातील वातावरण चांगलेच तापले आहे.
राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच नुकतेच शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी मालवणमधील एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. तेव्हा संबंधित भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेली एक बॅग आढळून आली होती. तसेच हे पैसे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना वाटायला दिल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर आता या प्रकरणात आमदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घडामोडींवर बोलताना नीलेश राणे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
आमदार नीलेश राणे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केलाय. तिकीट वाटपाच्या वेळी घडलेला किस्सा सांगताना “मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिकीट मागत होतो. तेव्हा त्यांनी ‘एका घरात तीन तिकिटे कशी देणार?’ असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मी त्यांच्या पायाला हात लावून तिथून निघालो, असे नीलेश राणे म्हणाले.
आता निवडून आल्यावर भाजपचे नेते मला पक्षात येण्याचा आग्रह करत आहेत. ‘तू लोकसभा किंवा विधानसभा भाजपमधूनच लढव’, अशा ऑफर दिल्या जात आहेत. पण मी शिंदेंशी गद्दारी करणार नाही. मला मंत्रिपदाची किंवा मोठ्या पदाची लालसा नाही असे त्यांना स्पष्ट सांगितले,” असा गौप्यस्फोट नीलेश राणे यांनी केला.
नीलेश राणे यांनी यावेळी काही भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. मी प्रामाणिकपणे काम करतोय. शिवसेना ठाकरे गटातील लोकांना सहभागी करून घेतोय. भाजप नेत्यांना त्याचा त्रास होतोय. तू यांना का घेतोय? तुला तर भाजपमध्ये यायचे आहे. तर त्यांनी तू का घेतोय असे विचारले. मी ‘येणार नाही, घरी बसेन,’ असे सांगितले. जर मी एकनाथ शिंदेंना सोडले, तर मला देव माफ करणार नाही. मग मला राजकारणात काही नाही मिळालेमला कोणत्याही मंत्रिपदासाठी, मोठ्या पदात अजिबात रस नाही,” असे नीलेश राणे म्हणाले.
स्टिंग ऑपरेशन प्रकरणात नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलताना नीलेश राणे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “देशात हे पहिल्यांदाच घडत असेल की, ज्याने चोरी पकडून दिली, त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे. समोरच्या व्यक्तीला (भाजप पदाधिकारी) साधी नोटीस नाही, आणि माझ्यावर थेट एफआयआर? मी व्हिडिओत कुठेही तोडफोड केली नाही, हे लाईव्ह दिसले आहे. तरीही माझ्यावर गुन्हा दाखल झालाय. आता मला फक्त नोटीस नको, पोलिसांनी मला अटकच केली पाहिजे. मी पोलीस ठाण्याच्या बाजूलाच बसलो आहे, पाहूया पोलीस काय करतात,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.

