देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेत बहुमान
पुणे : दिल्लीतील पंडित बिरजू महाराजजी कलाश्रमतर्फे देशपातळीवर घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत नृत्यगुरू शभा भाटे यांची शिष्या आणि पुण्यातील युवा कथक नृत्यांगना श्रद्धा मुखडे हिला पहिल्या नृत्यगुरू पंडित बिरजू महाराज युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

लखनऊ घराण्याचे प्रसिद्ध कथक नर्तक, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी कलाश्रम ही संस्था स्थापन केली. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात यासाठी संस्थेतर्फे पंडित बिरजू महाराज कलाश्रमतर्फे साधना महोत्सवात १८ ते २५ वयोगटातील कथक नृत्य कलाकारांसाठी देशपातळीवर कथक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संस्थेतर्फे अर्ज मागविण्यात आले होते. देशाच्या विविध भागातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांमधून २० कलाकारांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. अंतिम फेरी दिल्ली येथील त्रिवेणी कलासंगम ऑडिटोरिअम येथे घेण्यात आली. महाराष्ट्रातील केवळ तीन स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते.
नृत्यगुरू शभा भाटे यांच्याकडे गेल्या १० वर्षांपासून श्रद्धा मुखडे नृत्याचे प्रशिक्षण घेत असून त्यांच्या समवेत विविध नृत्य महोत्सवांमध्ये सहभागी होत आहे. कथक गुरू मंजुश्री चॅटर्जी आणि कथक गुरू डॉ. पद्मश्री शोभना नारायण यांच्या हस्ते श्रद्धा मुखडे हिला पंडित बिरजू महाराज युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गुरू मंजुश्री चॅटर्जी, गुरू गीतांजली लाल, संगीता सिन्हा, कल्पना वर्मा, अनिता कुलकर्णी यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

