दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे डॉ. अ. ल. देशमुख यांना ‘आबासाहेब अत्रे पुरस्कार’ तरविनया देसाई, संजय भैलुमे यांचा ‘इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार’
पुणे : शिक्षण हे परिवर्तनाचे मोठे साधन आहे. शिक्षणामुळे केवळ स्वतःमध्ये नाही तर समाज आणि देशामध्येही बदल घडून येण्यास मदत होते. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले तर समाज परिवर्तन होणार नाही. त्यामुळे शिक्षणाला कायमच विशेष महत्त्व असायला हवे, असे मत सर्जनशील शिक्षणतज्ज्ञ व प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले.
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘आबासाहेब अत्रे पुरस्कार’ ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांना तर ‘इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार’ क्रीडा क्षेत्रातील निवृत्त शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते संजय भैलुमे तसेच कर्णबधिर मुलांच्या शिक्षिका, निवेदक, लेखिका विनया देसाई यांना डॉ. एकबोटे यांच्या हस्ते आज (दि. २९) प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. संस्थेच्या खुल्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे हे १४ वे वर्ष आहे.
डॉ. देशमुख यांना दिल्या गेलेल्या पुरस्काराचे स्वरूप पंधरा हजार रुपये व मानचिन्ह तर संजय भैलुमे व विनया देसाई यांना दिल्या गेलेल्या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी दहा हजार रुपये व मानचिन्ह असे आहे. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव प्रफुल्ल निकम, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे मानद अध्यक्ष अशोक वळसंगकर मंचावर होते. पुरस्कार संयोजन समिती प्रमुख प्रसाद भडसावळे, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. यांची उपस्थिती होती.
डॉ. एकबोटे म्हणाले, आबासाहेब अत्रे हे माझ्या वडिलांचे जवळचे मित्र होते, त्यामुळे त्या काळात प्रतिकूल परिस्थितीत आबासाहेबांनी ही शाळा उभी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय कष्ट घेतलेत ते मी जवळून पाहिले आहेत. अशा व्यक्तींमुळेच शिक्षणाचे महत्त्व टिकून आहे. आपला देश हा राजकारण्यांमुळे चालत नाही, तर समाजात विविध क्षेत्रात मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींमुळे हा देश चालत आहे. अशा व्यक्ती समाजातील आदर्श आणि हिरे असतात.
शिक्षणावर विश्वास ठेवायलाच हवा..
शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले, सध्या शिक्षणाची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट झाली आहे. पूर्वीच्या काळातील शिक्षण आणि आताचे शिक्षण यामध्ये खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. शिक्षणाशिवाय देश, समाज मोठा होऊ शकत नाही, त्यामुळे शिक्षणावर विश्वास ठेवायलाच हवा.
विनया देसाई आणि संजय भैलुमे यांनीही मनोगत व्यक्त केले. उदय जगताप यांनी संजय भैलुमे यांचा, सुप्रिया गोडबोले यांनी विनया देसाई यांचा आणि स्नेहल दामले यांनी डॉ. अ. ल. देशमुख यांचा परिचय करून दिला. अपर्णा डोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
जगाला भारताने शिक्षणाची परंपरा दिली असून आजही भारतीय शिक्षण पद्धतीमुळे देश अनेक क्षेत्रात उंचीवर आहे. शिक्षणाच्या माध्यमातून प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यायला हवे, हे सांगत असताना लाडकी बहिण योजनेसोबतच सरकारने लाडका शिक्षक योजना राबवायला हवी. राजकारण्यांनी शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा.
– डॉ. अ. ल. देशमुख

