अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे अशोक मुळे यांचा जीवनगौरव तर ल. म. कडू यांचा साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने गौरव
पुणे : नव्या काळाची आव्हाने स्वीकारत मराठी भाषा, साहित्य आणि प्रकाशन व्यवसायाला उत्थानाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी भारत सासणे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ आयोजित उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती, दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार, जीवनगौरव आणि साहित्यसेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात सासणे अध्यक्षपदावरून बोलत होते. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ बालसाहित्यकार ल. म. कडू, डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळे, प्रसिद्ध लेखक, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते योगेश सोमण, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, पराग लोणकर व्यासपीठावर उपस्थित होते.
या समारंभात डिंपल पब्लिकेशनचे संचालक अशोक मुळे यांना जीवनगौरव पुरस्काराने तर बालसाहित्यकार ल. म. कडू यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण यांची प्रमुख उपस्थिती होती.
सासणे पुढे म्हणाले, आपली प्राचीन ज्ञानपरंपरा पोहोचणारे ऋषी, हे प्रकाशन व साहित्याचे आद्य रूप म्हटले पाहिजे. लेखकाचे शब्द रसिकांसमोर, वाचकांसमोर आणणारा दुवा, प्रकाशक असतो. नव्या काळात वाचक कमी होणे, मराठी वाचन घटणे अशी आव्हाने आहेत. त्यासाठी मराठीमधील अभिजात साहित्य पुन्हा प्रकाशित करण्याची आवश्यकता आहे. मराठी साहित्य आणि प्रकाशन व्यवसायाने कात टाकून उभे राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
योगेश सोमण यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम या वेळी आयोजित करण्यात आला होता. त्यांच्याशी अमृता कुलकर्णी आणि पराग लोणकर संवाद साधला. सोमण म्हणाले, मी लेखन, दिग्दर्शन, प्रशिक्षण आणि अभिनय क्षेत्रात काम करतो. यापैकी लेखकाची आणि प्रशिक्षकाची भूमिका मला सर्वांत जवळची वाटते. सोमण यांनी त्यांच्या जडणघडणीची माहिती या वेळी दिली. पं. सत्यदेव दुबे, वासुदेव पाळंदे, प्रकाश पारखी यांच्यामुळे अभिनयाचे मार्गदर्शन मिळाले. लेखक म्हणून मी अनेक साहित्यप्रकार हाताळले असले तरी एकांकिका लेखनात मी मनापासून रमतो. एकांकिका लेखन हा साहित्याचा स्वतंत्र प्रकार आहे, असे मत सोमण यांनी व्यक्त केले. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना, तेथील व्यावसायिकतेचे कौतुक वाटते. ही मंडळी मराठी रंगभूमीवरील कलावंतांना अतिशय मानतात, हे जाणवते.
मनोगत मांडताना ल. म. कडू म्हणाले, मी गेल्या ४० वर्षांपासून मुलांत मूल होऊन रमत आलो आहे. मूल समजून घेणे अवघड असते. ते मूलपण समजून, त्यांच्या वृत्ती, भावनांचा वेध लेखकांनी घेतला पाहिजे. वयोगट लक्षात घेऊन बालसाहित्यिकांनी लिहिले पाहिजे. मुलांशी संवाद साधून, त्यांना पुनरावृत्ती आवडते, हे जाणून लेखकांनी लिहावे. तसेच मनोरंजनाला प्राधान्य, प्रबोधन नंतर, हा क्रम लक्षात घ्यावा, असेही ते म्हणाले. प्रकाशन व्यवसाय माझ्यासाठी व्यवसाय नाही. माझ्यासाठी ते व्रत आहे, हे मानूनच मी आजवरची वाटचाल केली आहे, असे त्यांनी सांगितले.
अशोक मुळे यांनी डिंपल प्रकाशनाच्या माध्यमातून गेली ५० वर्षे केलेल्या साहित्यसेवेचा गौरव झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाळकरी वयात वाचनालयात नोकरी केल्याने पुस्तकांविषयी आस्था निर्माण झाली. नंतर सतत चांगलीच माणसे भेटत गेल्याने व्यावसायिक क्षेत्रात दखलपात्र काम केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

