मुंबई : लोककला क्षेत्रातील भरीव आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार–सन 2024 जाहीर केला आहे.
गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ लोककलावंतांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे गायकवाड हे लोककला व तमाशा परंपरेचे अभ्यासक म्हणूनही ओळखले जातात. प्रयोगात्मक कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल सांस्कृतिक कार्य विभागाने त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.
तमाशा सम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यासाठी त्यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. तसेच राज्यातील लोककलावंत अनुदान शिफारस समितीवर त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे.
गायकवाड हे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे दीर्घकाळ सदस्य राहिले असून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीवर सध्या ते सक्रियपणे काम करीत आहे. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा वर्षानुवर्षे कार्यसंबंध आहे

