पुणे-भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांनी सुरेश धस यांच्या एका कथित 1000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा दाखला देत हा दावा केला आहे. त्यांच्या आरोपामुळे बीड जिल्ह्यातील कथित गुन्हेगारी व तेथील पुढाऱ्यांच्या कथित काळ्या कारनाम्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
असीम सरोदे यांनी शनिवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी वरील दावा केला. ते म्हणाले, राम खाडे यांनी सुरेश यांचे 1000 कोटींची जमीन हडप केल्याचे प्रकरण काढले होते. हे प्रकरण माझ्याकडे होते. मी काही दिवसांपूर्वीच राम खाडे यांना काळजी घेण्यासी सूचना केली होती. त्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. आत्ता सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवालाही धोकाही आहे. राम खाडे यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांच्या जवळच्या लोकांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 1000 कोटींचा भूखंड घोटाळा काढल्यामुळेच रामवर हल्ला झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. सध्या राम यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. तिथे त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे कळते.
असीम सरोदे म्हणाले, सुरेश धस यांच्या मदतीने व पुढाकाराने देवस्थानची हजारो एकर जमीन खासगी मालमत्ता असल्यासारख्या वळवून घेण्यात आल्या. त्यानंतर त्याच्यावर प्लॉट पाडण्यात आले. त्यांची विक्री करण्यात आली. असा एक खूप मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे राम खाडे यांचे म्हणणे होते. त्यांनी माहितीच्या अधिकारात याविषयीची खूप मोठी माहिती काढली होती. हे सर्व बीडमधील प्रकरण आहे. मुख्यतः देवस्थानाच्या जमिनी हडप करणे ते ही भाजपच्या आमदाराने हे फार गंभीर प्रकरण म्हणून पुढे आले होते.
राम खाडे यांनी याविषयी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नव्हती. त्यामुळे आम्ही राम खाडे यांच्या मार्फत मुंबईच्या ईडी कार्यालयात तक्रार केली होती. माझ्या माहितीनुसार, या तक्रारीसोबत जवळपास 200-300 कागदपत्रे लावण्यात आली होती. सुरेश धस यांनी 1000 कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचे धडधडीत पुरावे दिसत होते. त्यामुळे आता सुरेश धस यांच्याकडून माझ्याही जीवाला धोका आहे, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे सुरेश धस हे भाजपचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे व त्यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांच्याविरोधात जोरदार टीका केली होती. त्यानंतर मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर वाल्मीक कराडलाही अटकेला सामोरे जावे लागले होते. धस यांनी पीक विमा प्रकरणातही स्वतःच्याच महायुती सरकारला धारेवर धरून त्यासंबंधीच्या घोटाळ्याची विस्तृत चौकशी करण्याची मागणी केली होती. या दोन्ही प्रकरणांत त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे महाराष्ट्रभर कौतुक झाले होते. पण आता त्यांच्यावरच असीम सरोदे यांनी वरील आरोप केले आहेत. त्यावर सुरेश धस व भाजप कोणती भूमिका घेते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

