कनेक्टिंग ट्रस्टतर्फे आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत मानसिक आरोग्यावर विचारमंथन
पुणे: “सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि समाजकल्याण विभागाचा यांच्यात योग्य समन्वय साधला, त्याला सामाजिक जनजागृतीची आणि संवेदनशील हाताळणीची जोड मिळाली, तर समाजातील आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळेल,” असे प्रतिपादन पॉलिसी मेकर्स फोरम फाॅर मेंटल हेल्थचे अध्यक्ष, तसेच टाटा ट्रस्टचे वरिष्ठ सल्लागार डाॅ. दलबीरसिंह यांनी केले.
आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत कनेक्टिंग ट्रस्टच्या वतीने २० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून, आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्यासाठी नवीन दृष्टीकोन’ यावरील विशेष संवादसत्रात डाॅ. दलबीरसिंह यांचे ‘जर्नी ऑफ द फोरम अँड पॉलिसी चेंजेस’ या विषयावर बीजभाषण झाले. यावेळी राज्यसभेच्या माजी खासदार ऍड. वंदना चव्हाण, युवा कार्यकर्ते अनीश गावंडे, जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्या डाॅ. लक्ष्मी विजयकुमार यांनी विचार मांडले.
डाॅ. दलबीर सिंह म्हणाले, “मानसिक आरोग्यविषयक सुविधा शहरांपुरती मर्यादित न राहता, जिल्हा व तालुका स्तरावर पोहोचली पाहिजे. एखादी व्यक्ती, विद्यार्थी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे, हे ओळखून, त्याला त्वरित आवश्यक ती मदत, दिलासा, समुपदेशन सुविधा उपलब्ध होणे आणि दिवसातील सर्वाधिक काळ विद्यार्थी ज्या शाळेत, कॉलेजमध्ये, विद्यापीठात वावरतात, तिथेच जाणीवजागृती करणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य हे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय घटकांशी जोडलेले असते, हे जागतिक आरोग्य संघटनेकडूनही मान्य करण्यात आले आहे. आत्महत्या प्रतिबंधासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी यंत्रणा, संस्था, व्यक्ती यांनी परस्पर समन्वय ठेवत, समुपदेशन आणि जाणीवजागृती करायला हवी.”
ॲड. वंदना चव्हाण म्हणाल्या, “आत्महत्येसारख्या टोकाच्या कृतीशी अनेकदा सामाजिक, आर्थिक घटक निगडीत असतात. आपल्याकडे आत्महत्या प्रतिबंधाचे धोरण आहे, प्रतिबंधाचा कायदा आहे आणि नव्याने निर्माण केलेली स्ट्रॅटेजीही आहे. मात्र, त्यामधील माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आपली यंत्रणा कमी पडते. युवा पिढीसमोरची नव्या काळातील नवी आव्हाने, जीवघेणी स्पर्धा, गतिमान जगण्यातून आलेले ताण-तणाव, दडपण, अपयश स्वीकारण्याची तयारी, बेरोजगारी असे अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत, पण शारीरिक दुखापतीकडे ज्या गांभीर्याने बघितले जाते, तेवढे लक्ष मानसिक दुखापतींकडे दिले जात नाही.”
डाॅ. लक्ष्मी विजयकुमार म्हणाल्या, “आत्महत्या हे वैयक्तिक अपयश न राहता, संबंधित व्यक्तीच्या कुटुंबिय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि भवतालाचेही अपयश ठरते. आत्महत्येला प्रवृत्त करणारे घटक नेमके कोणते, हाही मुद्दा कळीचा असतो. अनेकदा सामाजिक ढाचा गुन्हेगार असू शकतो. विद्यार्थ्याला कशाची तरी भीती वाटत असते. त्यातून त्याची देहबोली बदलते, पण ती ओळखण्याचे प्रशिक्षण आपल्या शिक्षक, पालकांना नसते. यंत्रणांचे एकत्रित प्रयत्न, संवेदनशील हाताळणी, जबाबदारीची भावना आणि सातत्याने दिलेला पाठिंबा, यातून आत्महत्येचे प्रमाण कमी होईल.”
अनीश गावंडे यांनी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे या परिसरात विद्यार्थ्यांना व्यसनाधीन करणार्या घटकांच्या उपस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. शाळकरी विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या वेदनादायी आहेत. व्यसन म्हणजे काय, हेही माहिती नसलेले विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी जाऊन टोकाचे पाऊल उचलतात, हे रोखण्यासाठी विद्यार्थ्यांशी सतत संवाद हवा, असे ते म्हणाले. ट्रस्टचे सल्लागार मंडळाचे सदस्य वीरेन राजपूत यांनी स्वागत केले. डाॅ. सुकीर्ती चौहान यांनी समायोजन केले.

