मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन, पदाधिकारी व प्राणीमित्रांची सर्वोच्च न्यायालयाला हजारो पत्रे.
मुंबई, दि. २९ नोव्हेंबर २०२५
भटकी कुत्री व रस्त्यावरच्या प्राण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन अपेक्षित आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा मानव व प्राणी यांच्या सहजीवनामध्ये अनावश्यक दरी निर्माण करू शकतो. न्यायालयाने आपल्या आदेशाची अंमलबजावणी स्थगित करून संविधान पीठासमोर नव्याने व सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन पुनर्विचार करावा असे मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबर रोजी भटक्या कुत्र्यांबाबत दिलेल्या निकालाचा पुनर्विचार करावा म्हणून देशभरातील प्राणीप्रेमींनी हजारोंच्या संख्येने सर्वोच्च न्यायालयाला पत्रे पाठवली आहेत. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन व युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांनी याच विषयावर पत्रं पाठवली आहेत. शनिवारी दुपारी झीनत शबरीन आपल्या सहका-यांसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्या, त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्रं पाठवली.
सर्वोच्च न्यायालयाला पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय वैज्ञानिक, वैद्यकीय आणि व्यावहारिक दृष्टीनेही अंमलात आणणे कठिण आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी करण्याची जबाबदारी असणा-या संस्थांकडे त्यासाठी लागणा-या निधीची तरतूद नाही, पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. भटक्या प्राण्यांना आपली वेदना, भीती किंवा हक्क व्यक्त करता येत नाही, त्यामुळे त्यांच्याशी संवेदनशील आणि न्याय्य वर्तन करणे हीच खऱ्या अर्थाने मानवी जबाबदारी आहे. करुणा, मानवता आणि जबाबदारी ही आपल्या समाजाची मूलभूत मूल्ये आहेत, आणि त्यांचे रक्षण आपण सर्वांनी एकत्रितपणे करायला हवे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांवर कारवाई सुरू झाली असली, तरी हा आदेश अत्यंत विस्तृत आणि अंमलबजावणीसाठी विशिष्ट अटींसह आहे. अशा कारवाईपूर्वी योग्य शेल्टर, वैद्यकीय सुविधा, दत्तक प्रोत्साहन यंत्रणा आणि ABC (Animal Birth Control) केंद्रे तयार करणे आवश्यक आहे. परंतु या पर्यायी व्यवस्था उभ्या न करता थेट कारवाई करणे हे केवळ अमानवी आणि अविचारी नाही, तर नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे, त्यामुळे न्यायालयाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा.
यावेळी पंकज चौधरी, अजय मिश्रा, अमनदीप सैनी, आसिफ खान, तेजस चांदूरकर, शेखर जगताप, प्रज्ञा ढवळे, निखिल रुपारेल यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

