स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत मविआत नाराजी नाही; सर्वच पक्षांचा स्वबळाचा निर्णय; कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा.
नाशिकमध्ये साधुंसाठी झाडांची कत्तल हा एक बहाणा; साधुग्रामच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ताधारी पक्षांची धडपड.
मुंबई/बुलढाणा, दि. २९ नोव्हेंबर २०२५
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच ‘कोणाचेही पैसे घ्या, पण मतं मात्र आम्हालाच द्या’, असे जाहीरपणे सांगतात हा लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे. भाजपा महायुतीचे काम ‘पैसा फेक तमाशा देख’ असा असून मंत्रीच जाहीरपणे कबुली देतात याचा अर्थ काँग्रेस व राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतचोरीवर शिक्कामोर्तबच आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांनी या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केलेली आहे त्याचा आदर ठेवून काँग्रेस व महाविकास आघाडीतील पक्ष निवडणुका लढवत आहेत. काही ठिकाणी आघाडी झालेली आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढाई होत आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे यांना याची कल्पना दिलेली होती, यामुळे आघाडीत कोणी नाराज असण्याचा प्रश्नच नाही. जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही, त्यावर नंतर निर्णय घेतला जाईल.
महायुती सत्तेसाठी लाचार….
महायुतीतील अंतर्गत वादावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुतीतील ट्रिपल इंजिन सरकार हे सत्तेशिवाय राहु शकत नाही, भाजपा, शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेसाठी लाचार आहेत, त्यामुळे महायुतीत कितीही धुसफूस असली तरी सत्तेसाठी ते जुळवून घेतील असे सपकाळ म्हणाले..
तपोवनातील झाडांची कत्तल पैसे खाण्यासाठी…
कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनमधील १८०० झाडं तोडण्याच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, साधु हे दऱ्या खोऱ्या, डोंगर, हिमालय तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहतात, ही अध्यात्माची परंपरा आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे. पण पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन होत नसेल तर ते कोणालाही परवडणारे नाही. झाडांची कत्तल केली नाही तर पैसे कसे लाटता येतील. मोठ्या प्रमाणावर झाडं तोडणे हे एक निमित्त आहे, खरे कारण झाडं तोडून मैदान माकळं करायचे व त्यातून खिसे भरायचे असा प्रकार आहे असे सपकाळ म्हणाले.
फडणविसांनी मला ओळखावे हा अट्टाहास नाही…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ते मला ओळखत नाहीत असे म्हणत असतील तर काही हरकत नाही, आम्ही दोघे विदर्भातील आहोत ते मुख्यमंत्री असताना मी ५ वर्षे विधानसभेत विविध प्रश्न मांडले त्याची उत्तरे त्यांनी दिलेली आहेत. मला ओळखावे हा माझा अट्टाहास नाही व ओळखावे यासाठी जे प्रोफाईल हवे तसा मी भ्रष्टाचार केलेला नाही, पक्ष बदललेले नाहीत, ईडीची प्रकरणे नाहीत, संस्था माझ्याकडे नाहीत. मी एका सर्व साधारण कुटंबातील आहे. फडणवीस यांची बुद्धी तल्लख आहे असे वाटत होते. ओळखीचे त्यांचे निकष काय आहेत ते माहीत नाही परंतु त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने मात्र विसरू नयेत. महाराष्ट्राचे वाट्टोळे करणारे गुंड कोण आहेत, त्यांना तरी ओळखा व धडा शिकवा असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
म्हणून फडणविसांना गजनी म्हणालो…
मुख्यमंत्र्यांना गजनी म्हटले त्यामागे त्यांना त्यांच्या विधानांचा विसर पडला आहे म्हणून बोललो. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे ते म्हणाले होते पण त्यांनी लग्न केले. अजित पवारांना चक्की पिसिंग करायला लावू, राष्ट्रवादी काँग्रेसशी कधीच युती करणार नाही असे म्हणाले पण युती केली व अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. सरकार येताच पहिली सही धनगर आरक्षणाच्या फाईलवर करू म्हटले होते. नांदेडमध्ये २०१४ पर्यंत विकासच झाला नाही असेही ते म्हणाले, त्यांच्या लक्षात काहीच रहात नाही म्हणून गजनी म्हणालो असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

