पुणे-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा कथित अवमान केल्याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात सादर करण्यात आलेली पुराव्यांची सीडी ब्लँक निघाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार गुरुवारच्या सुनावणीत घडला. पण तो आज समोर आला. याराहुल गांधी यांनी 2019 मध्ये लंडनमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी एक कथित वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी सावरकरांचे पणतू सत्यकी सावरकर यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यांनी राहुल यांच्या भाषणाचे रेकॉर्डिंग असलेली एक सीडी सीलबंद लिफाफ्यात कोर्टात सादर केली होती. याच सीडीच्या आधारावर कोर्टाने राहुल गांधी यांच्याविरोधात समन्स जारी केला होता. गुरुवारी न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्यापुढे सत्यकी सावरकर यांची मुख्य उलटतपासणी सुरू होती. त्यात ही सीडी मुख्य पुरावा म्हणून सादर करण्यात आली.यावेळी कोर्टाने ही सीडी चालवून पाहण्याचे आदेश दिले. त्यानुसार ती उघडून चालवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यात कोणताही डेटा नसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे कोर्टरूममध्ये उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सीडी कोरी निघाल्याचे पाहून सत्यकी सावरकरांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी कोर्टाला आठवण करून दिली की, याच सीडीच्या आधारावर कोर्टाने राहुल गांधींविोरधात कारवाई सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी कोर्टाला यूट्यूबवर राहुल गांधींचे ते कथित भाषण लावण्याची परवानगी मागितली. पण कोर्टाने त्यांची विनंती साफ फेटाळून लावली.
यूट्यूबवर भाषण लावण्यास कोर्टाचा नकार
न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे या प्रकरणी म्हणाले, ही यूआरएल भारतीय पुरावा अधिनियम कलम 65-ब अंतर्गत आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांसह सादर करण्यात आला नाही. त्यामुळे तो पुरावा म्हणून स्वीकारार्ह नाही. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पुरावा म्हणून कोर्टात ग्राह्य धरण्यासाठी कलम 65 ब नुसार प्रमाणीकरण प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यानतंर वकील कोल्हटकर यांनी आणखी 2 अतिरिक्त सीडी सादर करून कोर्टाला त्या तपासण्याची विनंती केली. पण राहुल गांधी यांच्या वकिलांनी त्याला कडाडून विरोध केला. त्यावर कोर्ट म्हणाले की, रेकॉर्डमध्ये अशा कोणत्याही अतिरिक्त सीडीचा उल्लेख नाही. त्यामुळे कोल्हटकर यांचा अतिरिक्त सीडी चालवण्याचा अर्जही नामंजूर करण्यात आला.
त्यावर कोल्हटकर यांनी कोऱ्या सीडीच्या रहस्याची न्यायिक चौकशी करण्याची मागणी करत सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यानुसार कोर्टाने ही सुनावणी काही काळासाठी स्थगित केली. दरम्यान, प्रस्तुत प्रकरणात महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर करण्यात आलेली सीडी ब्लँक निघाल्यामुळे तथा यूट्यूब लिंक व अतिरिक्त सीडी चालवण्याची मागणी फेटाळल्यामुळे राहुल गांधी यांना कोर्टात खेचण्याचा सत्यकी सावरकर यांना जोरदार झटका बसला आहे.

