पुणे:पुणे महापालिकेने ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे पालन केलेले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी कोणतीही अडचण नाही. असे उपायुक्त, निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितल्याने महापालिका निवडणुकीसाठीची
आचारसंहिता साधारणतः १५ डिसेंबरदरम्यान लागू होण्याची शक्यता आहे, तर जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.
न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता डिसेंबरच्या मध्यावधीत आचारसंहिता जाहीर होऊन जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे, यास महापालिका अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे.
महापालिकेने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रारंभी प्रभाग रचना जाहीर केली. त्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले. त्यापाठोपाठ प्रारूप मतदार यादीही जाहीर केली. तसेच, हरकती-सूचना घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो यामुळे इच्छुक आणि ज्यांना खरोखर लढायचे आहेच त्यांना प्रचार प्रारंभ करावाच लागणार आहे.

