महात्मा जोतीराव फुले यांच्या १३५व्या स्मृतिदिनानिमित्त संविधानातून सामाजिक बांधिलकीचा संकल्प
पुणे, दि. २८ नोव्हेंबर २०२५ : फुलेवाडा येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या १३५व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन, सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि फुले विचारांचा पुनःस्मरण असा अर्थपूर्ण उपक्रम पार पडला. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख उपस्थित होत्या.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महात्मा फुले यांनी समानतेचा मार्ग दाखवला. त्यांच्या स्मृतिदिनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून लोकशाहीच्या मूल्यांची पुनःजाणीव करून देत आहोत.” त्यांनी सांगितले की २५ नोव्हेंबरपासून सुरू केलेली ‘शाखा—तिथे संविधान’ मोहीम वर्षभर राबवण्यात येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम अधिक बळकट झाला आहे.
महिला सुरक्षा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आणि तळागाळातील प्रश्नांना निवडणुकीत आवाज देणे हे शिवसेनेचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी व्यक्त केले. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या अंतिम टप्प्यातील कामाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख निलेश गिरमे यांनी केले. महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, शिवसेना प्रवक्ते किरण सोनवणे, युवा सेना सचिव किरण साळी, महिला संपर्काप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, युवासेना पदाधिकारी निलेश घारे, जिल्हा प्रमुख सोमनाथ कुटे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि महिला आघाडीतील कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन करून लोकशाहीचा संदेश देण्यात आला. दलित समाजाच्या जमिनी, महिलांची सुरक्षा, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आगामी अधिवेशनात ठोस आवाज उठवण्याची बांधिलकी डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केली.

